नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा आकांक्षीत जिल्हा असून १९ क्रमांकावर आहे. शासकीय कर्मचारी, अशासकीय संस्था नागरीक सर्वांनी मिळून राष्ट्रभक्तीची भावना ठेवत आकांक्षीत जिल्हामुक्त होवू या, असे आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याणमंत्री ना.डॉ.मनसुख मांडविया यांनी केले.
नंदुरबार येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खा.डॉ.हिना गावीत, जि.प.अध्यक्षा ऍड. सीमा वळवी, आ.डॉ.विजयकुमार, गावीत, आ.जयकुमार रावल, आ.राजेश पाडवी, जिल्हाधिकारी मनिषा खत्री, मुख्यकार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना डॉ.मनसुख मांडविया पुढे म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य, कृषी क्षेत्रात होत असलेले बदल सामाधानकारक आहे. यापुढे जिल्हाचास्तर उंचावण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास आकांक्षीत जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी आम्हाला पाठविले आहे. नंदुरबार जिल्हा आकांक्षीत जिल्ह्याच्या यादीत १९ व्या क्रमांकावर आहे. तो प्रथम क्रमांकावर कसा येईल. यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यापुढे आता जिल्ह्याचा विकासस्तर उंचावण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. इच्छाशक्ती असेल तर संकल्पपूर्ण होतो. यासाठी प्रत्येकाने मानसिकरित्या तयार असले पाहिजे. वचनबध्दता व समर्पण हीच यशाची गुरूकिल्ली असल्याचे ना.डॉ.मांडविया म्हणाले. पुढे ते म्हणाले की, प्रत्येकाने जिल्ह्याचा विकासासाठी प्रयत्न केला तर राज्य आणि राष्ट्राचा विकास होणार आहे. प्रत्येकाला देशाच्या सीमेवर जावून लढवून राष्ट्रभक्ती सिध्द करायची नाही तर प्रत्येकाने आपली जबाबदारी केल्यास त्यातून देशसेवा करता येते. असे डॉ.मांडविया म्हणाले. २०२५ पर्यंत देश क्षयमुक्त करण्याचा पंतप्रधानांचा मानस आहे. त्यामुळे मे महिन्यात रूग्णांचा शोध घेवून त्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. या मोहिमेत प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन डॉ.मांडविया यांनी केले. दरम्यान बैठकीचा सुरूवातीला प्रस्तावना करतांना जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी पीपीटिच्या माध्यमातून जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध प्रकल्प, कुपोषण मुक्तीसाठी प्रशासनाचे प्रयत्न, कृषीक्षेत्र व्यवसाय याबाबत माहिती दिली. यानंतर आयुष्यमान भारत योजनेचा कार्ड लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.
नंदुरबार जिल्ह्याच्या दौर्यावर आलेल्या ना.डॉ.मांडविया यांचे सकाळी नंदुरबार शहरात आगमन झाले. यावेळी नवापूर चौफुली येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर आरोग्यमंत्री डॉ.मांडविया यांनी जिल्हा रूग्णालयातील डायलिसेस सेंटर, पोषण व पुनर्वसन विभाग यासह विविध विभागांना भेटी दिल्या. त्यानंतर नांदर्खे येथील उपकेंद्र नंदुरबार शहरातील डिजीटल शाळा, कोळदा कृषी विज्ञान केंद्र आदी ठिकाणी भेटी देवून आढावा घेवून घेतला. यावेळी खा.डॉ.हिना गावीत, आ.डॉ.विजयकुमार गावीत, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, जि.प.सदस्या सुप्रिया गावीत, जिल्हाधिकारी मनिषा खत्री मुख्यकार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा शल्यचिकित्सक चारूदत्त शिंदे आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.










