नंदुरबार | प्रतिनिधी
शहादा येथील वीज वितरण कंपनीचे ९ कोटी ५७ लाख ७७ हजार ३२० रुपये एवढी रक्कम भरणे अपेक्षित असतांना त्याऐवजी ८ कोटी ९५ लाख ३९ हजार ६४९ रुपयांची रक्कमेचा भरणा करून उर्वरित ६२ लाख ३७ हजार ६७१ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सहाय्यक लेखापालविरूध्द शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा येथील वीज कंपनीच्या उपविभागीय कार्यालयातील सहाय्यक लेखापाल विजय तुळशीराम लांडगे यांना दि.२१ सप्टेंबर २०२० ते ३१ जानेवारी २०२२ या कालावधीत अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.या कालावधीत वीज वितरण कंपनीचे ९ कोटी ५७ लाख ७७ हजार ३२० रुपये एवढी रक्कम जमा होणे अपेक्षित होते.मात्र प्रत्यक्षात आठ कोटी ९५ लाख ३९ हजार ६४९ रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आली. उर्वरित ६२ लाख ३७ हजार ६७१ रुपयांचा अपहार केल्याच्या संशयावरुन व वीज कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याने भूषण विठोबा जगताप यांच्या फिर्यादीवरुन संशयित विजय लांडगे याच्याविरोधात शहादा पोलीस ठाण्यात भादंवि कलम४२०,४०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आरक करत आहेत.