नंदुरबार ! प्रतिनिधी
जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या कुपोषित बालक शोध मोहिमेच्या ‘नंदुरबार पॅटर्न’चे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी कौतुक केले असून येत्या 15 ऑगस्टपासून ही पद्धत संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे.
श्रीमती ठाकूर आणि महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव आय.एस.कुंदन यांच्या उपस्थितीत राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा राठोड उपस्थित होते.
महिला व बालविकास मंत्री श्रीमती ठाकूर यांनी नंदुरबार जिल्ह्याने शोध मोहिमेबाबत केलेल्या सादरीकरणाचे विशेष कौतुक केले. शोध मोहिमेसाठी राबविण्यात येणारी पद्धत उत्कृष्ट असून हा ‘पॅटर्न’ राज्यात राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गावडे यांनी उत्कृष्ट सादरीकरण केल्याचे नमूद करीत जिल्ह्याने चांगली कामगिरी केली असल्याचेही त्या म्हणाल्या.
श्री.गावडे यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेची माहिती दिली. महिला व बालविकास विभाग, आरोग्य विभाग आणि युनिसेफच्या एकत्रित प्रयत्नातून चांगले काम झाले आहे. शासनाच्या निर्देशानुसार वर्षातून दोन वेळा आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून शोध मोहिम राबविण्याचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कुपोषित बालकांना पावसाळ्याच्या सुरूवातीस विविध आजारांचा संसर्ग होत असल्याने व त्यामुळे बालमृत्यूदेखील होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यात पावसाळ्यापूर्वी धडक शोध मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत 3 हजार 224 अतितीव्र कुपोषित आणि 17 हजार 519 मध्यम कुपोषित बालके आढळली आहेत. या बालकांना ग्राम बाल विकास केंद्राच्या माध्यमातून अतिरिक्त आहार देण्यासोबत औषधोपचारही करण्यात येतात. वैद्यकीय उपचाराची आवश्यकता असल्यास अशा बालकांना पोषण पुनर्वसन केंद्रात किंवा बाल उपचार केंद्रात दाखल करण्यात येऊन त्यांच्यावर विशेष उपचार करण्यात येतात.