खेतिया l प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांवच्या विद्यार्थी विकास विभाग व शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय आणि पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यापीठ स्तरीय आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव युवारंग २०२१ हा दि.१९ ते २३ एप्रिल दरम्यान रंगणार असून विद्याश्रम परिसरात होणाऱ्या या विद्यापीठ स्तरीय आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव युवारंग २०२१ ची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या महोत्सवात हजारावर विद्यार्थी व विद्यार्थिनी आपले कलागुण सादर करणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव ही विशेष संकल्पना या महोत्सवात राहील.
जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यातर्फे शैक्षणिक वर्षे २०२१ -२२ आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव युवारंग येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या औषधनिर्माण-शास्त्र महाविद्यालय तसेच कला विज्ञान व वाणिज्य वरीष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने (ता.१९ ते २३) दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. एका दिवसावर येऊन ठेपलेल्या या महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून यशस्वीतेसाठी विविध समित्या प्रयत्न करीत आहेत.
दरम्यान (ता.१९) रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत संघांचे आगमन व नोंदणी होणार आहे. दि. २० तारखेला सकाळी ८ वाजता युवक महोत्सव युवारंगचे उदघाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांवचे कुलगुरू प्रा.डॉ.व्ही.एल. माहेश्वरी यांच्या हस्ते होणार आहे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दिपक पाटील तर प्रमुख अतिथी शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांवचे व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील, जिल्हा परिषद सदस्या सौ. जयश्रीताई पाटील यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. उद्घाटनानंतर एक खुल्या व चार बंदिस्त रंग मंचांवर सलग तीन दिवस विविध महाविद्यालयातून आलेले विद्यार्थी आपले कलागुण सादर करतील. एकाच वेळी पाच रंगमंचावर कलाकृती सादर होणार असून त्यासाठी रंगमंच क्रमांक (१) स्वातंत्र्य सेनानी अण्णासाहेब पी.के.पाटील, रंगमंच क्रमांक (२) बाल हुतात्मा शिरीषकुमार, रंगमंच क्रमांक (३) बाल हुतात्मा लालदास, रंगमंच क्रमांक (४) वीर भगतसिंग, रंगमंच क्रमांक (५) वीर बिरसा मुंडा असे पाच रंगमंच उभारण्यात आले असून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या रंगमंचांवर विडंबन नाट्य, मूकनाट्य, समूह लोकनृत्य, भारतीय लोकगीत, सुगम गायन, समूहगीत, शास्त्रीय नृत्य, लोकसंगीत, काव्यवाचन, वाद-विवाद, वक्तृत्व, शास्त्रीय वादन, भारतीय सुगम गायन, शास्त्रीय गायन, फोटोग्राफी, रांगोळी ,व्यंगचित्र, कोलाज ,क्ले मोडेलिंग, स्पॉट पेंटिंग, चित्रकला, इन्स्टॉलेशन, मेहंदी आदींसह विविध कला प्रकारांचा यात समावेश आहे.
१९ समित्या कार्यरत
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दिपक पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनात कला, विज्ञान व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील, औषधनिर्माण-शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. पवार, युवक महोत्सव समन्वयक डॉ. आय. जे.पाटील, यांनी विविध समित्यांची स्थापना केली असून समिती प्रमुखांसह प्रत्येकी दहा ते पंधरा सदस्यांच्या एकूण १९ समित्या बनविण्यात आल्या आहेत. यात स्वागत, नोंदणी, निवास, भोजन ,शिस्त, रंगमंचावर संचलन, छायाचित्रण, विद्युत पुरवठा, वाहनतळ आदी समित्यांचा समावेश आहे.
मंडळाचे संस्थापक स्वर्गीय अण्णासाहेब पी. के. पाटील यांच्या “थांबला तो संपला” हे सूत्र डोळ्यासमोर ठेवून मंडळाच्या विविध ज्ञानशाखांची वाटचाल सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञान विकासासोबतच त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी मंडळ सातत्याने विविध उपक्रम राबवित असते. विद्यापीठाने ह्या वर्षी विद्यापीठस्तरीय आंतरमहाविद्यालय युवक महोत्सव युवारंग २०२१ ची जबाबदारी आमच्या दोन्ही महाविद्यालयांना सोपवली असून ती यशस्वीपणे पार पाडली जाईल.
दिपक पाटील
(अध्यक्ष – पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ, शहादा)