- तळोदा । प्रतिनिधी
येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प येथे सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील प्रलंबित शिष्यवृत्ती अर्जा विषयी प्राचार्य, शिष्यवृत्ती कामकाज हाताळणारे लिपीक यांची दि.२१ जून २०२१ रोजी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुवर्णा सोळंकी, शिक्षण विस्तार अधिकारी बी.आर.मुंगळे, शिक्षण विस्तार अधिकारी बी.एम.कदम, शिक्षण विस्तार अधिकारी जी.डी.अखडमल, शिष्यवृत्ती विभागाचे श्री.नेरपगारे तसेच तळोदा, अक्कलकुवा, धडगांव तालुक्यातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, शिष्यवृत्ती कामकाज हाताळणारे लिपिक उपस्थित होते.
यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुवर्णा सोळंकी यांनी सांगितले की, तळोदा प्रकल्प कार्यालयांतर्गत सर्व महाविद्यालयांनी पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनांतर्गत सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील महाडीबीटी पोर्टलवर महाविद्यालय स्तरावरील अनुसूचित जमातीचे विद्यार्थ्यांचे प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज हे सर्व महाविद्यालयांनी लवकरात लवकर प्रकल्प कार्यालयाकडे पाठवावेत असे सांगितले.
तसेच शिक्षण विस्तार अधिकारी बी.आर.मुंगळे, बी.आर.कदम, बी.एम.कदम, जी.डी.अखडमल व शिष्यवृत्ती विभागाचे श्री.नेरपगारे यांनी सांगितले की, प्रलंबित शिष्यवृत्ती अर्जाच्या त्रुटी लवकरात लवकर पूर्ण करुन प्रकल्प कार्यालयाकडे पाठवावेत असे आवाहन केले.