नंदुरबार ! प्रतिनिधी
कोरोना आणि महापूर या दोन्ही प्रश्नांवर जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे . राज्यात दुकानांना रात्री ८ वाजेपर्यंत परवानगी देण्यात येईल , अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे . सांगली दौऱ्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते .
राज्यातील दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे . मात्र , ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे . तिथेच ही परवानगी असेल . कोरोना रुग्ण ( Corona ) संख्या अधिक असलेल्या ठिकाणी निर्बध कायम असतील , असं मुख्यमंत्री म्हणाले . या संदर्भातील जीआर ( GR ) आज संध्याकाळी निघेल असंही त्यांनी स्पष्ट केलं . सध्या सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंतच दुकाने सुरू आहेत . माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की , आपत्तीग्रस्तांना तत्काळ मदत देणं सुरू झालंय , कायमस्वरूपी तोडगा करण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील . लाखो लोकांचं स्थलांतर करण्यात प्रशासनाल यश आलं आहे . कमी कालावधीत जास्त पाऊस पडल्याने आपत्ती ओढावली आहे . काही वस्त्यांचं पुनर्वसन आवश्यक , नागरिकांनी यामध्ये सरकारला सहकार्य करण्याची गरज आहे . निसर्गासमोर आपण हतबल आहोत . असं देखील त्यांनी सांगितलं .
पॅकेज जाहीर करणार नाही नुकसानीबाबत मी कोणतेही पॅकेज जाहीर करणार नाही तसेच कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही . सरकार म्हणून जे जे आपल्या हिताचे आहे ते सर्व प्रामाणिकपणे करणार . तुम्ही अजिबात काळजी करू नका , आपली जी निवेदने आहेत ती द्या त्यातील सूचनांचा नक्कीच विचार करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी पूरग्रस्तांना दिली . भिलवडी येथील पूरबाधितांशी संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी अंकलखोप येथील पूरग्रस्तांशी अत्मियतेने संवाद साधत , शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभे असल्याची ग्वाही अंकलखोपवासियांना दिली . याप्रसंगी प्रांतअधिकारी मारुती बोरकर , तहसिलदार निवास ठाणे ( पलूस ) व कडेगाव तहसिलदार डॉ.शैलजा पाटील , गट विकास अधिकारी डॉ . स्मिता पाटील , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी , महेंद्र लाड , नितीन बानगुडे – पाटील , भिलवडीच्या सरपंच सविता पाटील यांच्यासह भिवलडी व अंकलखोपचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .