नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील पातोंडा शिवारातील मातोश्री कॉलनीतील मध्यरात्री चोरटयांनी कुटूंबिय घरात झोपलेले असतांनाही चलाखीने धाडसी घरफोडी केल्याची घटना घडली. या घरफोडीत चोरटयांनी रोकडसह सोन्या चांदीचे दागिने असा ६४ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नंदुरबार तालुक्यातील पातोंडा शिवारात असलेल्या मातोश्री कॉलनीत राहणारे गणेश छगन पवार यांच्या घरी चोरटयांनी डल्ला टाकला. पवार कुटूंबिय नेहमीप्रमाणे जेवण करून घरात झोपलेले होते. असे असतांना मध्यरात्री चोरटयांनी घराचा मागील दरवाजा उघडून आत प्रवेश केला. यावेळी कपाटातून तीन ग्रॅम वजनाची सोन्याची पोत व दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे डोरले १० भार वजनाचे चांदीच्या पायातील जोडवे आणि स्टीलच्या डब्यात ठेवलेली ४० हजार रूपयांची रोकड असा एकूण ६४ हजार रूपयांचा ऐवज चोरटयांनी लांबविला आहे. दुसर्या दिवशी गणेश पवार यांचे कुटूंबिय उठल्यावर घरात साहित्य अस्ताव्यस्त तर घराचा मागील दरवाजा देखील उघडा असल्याचे दिसून आले. याबाबत गणेश छगन पवार यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










