नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथून मोटारसायकल व मोबाईल लंपास करणाऱ्या तीन संशयित आरोपीतांना स्थानिक गुन्हे शाखेने सुरत येथे अटक केली असून त्यांच्याकडून ५६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि . ३१ मार्च रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास गोविंद रामचंद्र कोकणी रा पळसुन ता.नवापुर हे विसरवाडी गावाजवळ रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ रस्त्यालगत लघुशंकेसाठी गेले असता त्यांच्या मालकीची काळया रंगाची शाईन मोटार सायकल (क्र . एम.एच. ३९, ए.ए.७९३३)व व्हिवो कंपनीचा मोबाईल असा एकूण ३६ हजाराचा मुद्देमाल अज्ञात तीन चोरट्यांनी चोरून नेला म्हणून विसरवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीतांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदरचा गुन्हा उघडकीस आणुन आरोपीतांवर प्रतिबंधक कारवाई करणे बाबत पी . आर . पाटील , पोलीस अधिक्षक , नंदुरबार यांनी आदेशीत केले होते . सदर गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखेकडुन समांतर तपास सुरु असतांना दि. ६ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , सुमारे ६ ते ७ दिवसापूर्वी विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीतील मोटारसायकल व मोबाईल चोरणारे उधना , सुरत येथील आहेत . अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करुन उधना सुरत येथे रवाना केले . उधना सुरत येथे गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे संशयीत आरोपीतांचे फक्त वर्णन होते . त्यामुळे उधना सुरत सारख्या गजबजलेल्या शहरात संशयित आरोपीतांच्या वर्णनावरुन आरोपीतांना शोधण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अनेक अडचणी येत होत्या . परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २ ते ३ दिवस सुरत उधना येथे अहोरात्र मेहनत घेवून संशयीत आरोपी रहात असलेल्या परिसरात वेशांतर करुन सापळा रचला व दि . ८ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास सदर गुन्हयातील एका संशयीत पंकज मच्छिद्र सैंदाणे रा . आंबारे ता अमळनेर जि.जळगाव ह.मु.गांधी कुटी , कम्युनिटी हॉल घर नं . ५१ , उधना , सुरत गुजरात राज्य यास अटक करीत विसरवाडी येथील मोटारसायकल व मोबाईल चोरी बाबत विचारपुस केली असता , तो उडवा उडवीची उत्तरे देव लागला . म्हणुन त्यास पोलीसी खाक्या दाखविल्या असता , त्याने सदरचा गुन्हा उधना येथीलच त्याचे इतर दोन साथीदार रियाज व दिपक यांच्या मदतीने केला असल्याची माहिती सांगितली . त्यास मोटारसायकल बाबत विचारले असता , त्याने विसरवाडी येथुन चोरी करुन आणलेली मोटारसायकल घराच्या मागील बाजुस लपवुन ठेवलेली आहे व मोबाईल बंद करुन कपाटात ठेवलेला आहे . त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोटारसायकल व मोबाईल हस्तगत केला . स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात असलेला संशयीत आरोपी पंकज याच्या घरापासून काही अंतरावर राहत असलेले पठाण रियाज रज्जाक खान रा . संजय नगर , गोगा प्लॅट न . २०१ उधना सुरत गुजरात, दिपक अनिलभाई जयस्वाल उर्प दिपक अनिलभाई हरिजन रा.घर नं .८०४ नुरानो वसाहत , रामदेव नगर , उधना , सुरत ( गुजरात राज्य ) यांना ताब्यात घेवून विचारपुस केली असता , त्यांनी देखील गुन्हा केल्याचे सांगितले . ताब्यात घेण्यात आलेले तीन संशयित आरोपी व गुन्हयातील चोरीस गेलेली ३१ हजार रुपये किमतीची मोटार सायकल व ५ हजार रुपये किमतीचा मोबाईल तसेच २० हजार रुपये किमतीची गुन्हा करते वेळी वापरलेली स्कुटी असा एकुण ५६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी व मुद्देमाल गुन्हयाच्या पुढील तपास कामी विसरवाडी पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आलेला आहे . सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक पी . आर पाटील , प्रभारी पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , पोहेका प्रमोद गुलाबराव सोनवणे , पोना दादाभाई दामु मासुळ , पोना जितेंद्र उदयसिंग ठाकुर , पोना मोहन पांडुरंग ढमढेरे , चापांना रमेश सांळुखे , पोशि राजेंद्र चिंतामण काटके , पोशि शोएब जब्बार शेख यांचे पथकाने केली आहे .










