नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार-सुरत रस्त्यावर दुचाकींच्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील आष्टे येथील संदिप बापु खाडे (वय ३२) हे दुचाकीने (क्र.एम.एच.३९ एच ९९८१) नंदुरबार येथे मेडीकल घेण्यासाठी नंदुरबार-सुरत रस्त्याने येत होते. यावेळी महम्मद रिहान मोहम्मद नसिरोद्दीन अन्सारी रा.श्रीराम नगर, नंदुरबार याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच.३९ आर ३२७५) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भिका चौधरी यांच्या पेट्रोल पंपासमोरील पुलाजवळ समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला. घडलेल्या अपघातात संदिप खाडे हे ठार झाले तर दोन्ही दुचाकींचेही नुकसान झाले. याबाबत बाबू सुकदेव खाडे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात महम्मद रिहान मोहम्मद नसिरोद्दीन अन्सारी याच्याविरोधात भादंवि कलम ३०४ (अ०, २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक हेमंत मोहिते करीत आहेत.