शहादा l प्रतिनिधी
शहादा शहरातील प्रकाशा रस्त्यावर मनीष पेट्रोल पंपाजवळ ट्रॅक्टर व महेंद्रा एस्कॉर्ट कंपनीच्या कारच्या भीषण अपघात होऊन त्यात ट्रॅक्टरचे दोन तुकडे होऊन पेट्रोल पंपाच्या आवारात फेकले गेले.या विचित्र अपघातात सुदैवाने प्राणहानी झाली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज दि.८ एप्रिल रोजी दुपारी सव्वाचार वाजता गजेंद्र भुरेसिंग गिरासे रा.वर्धे टेंभे ता. शहादा हे आपली महिंद्रा कंपनीची एस्कॉट कार (क्र. एम. एच.जे.जे.04 .11) ने शहादाकडून आपल्या गावी जात असतांना मनीष पेट्रोल पंपाजवळ पेट्रोल पंपातून बाहेर येणाऱ्या ट्रॅक्टरशी जोरदार धडक बसली.पेट्रोल पंपाच्या परिसरात कानठळ्या बसवणारा मोठा आवाज झाला.नागरिकांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली.या अपघातात ट्रॅक्टरचे अक्षरशः दोन तुकडे झाले तर कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला.ट्रॅक्टरच्या ज्या भागात चालत बसतो तो भाग पेट्रोल पंप परिसरात फेकला गेला.दोन्ही वाहनांचे चित्र बघता मोठी प्राणहानी झाली असेल असे वाटत होते मात्र सुदैवाने प्राणहानी झाली नाही.मात्र दोन्ही वाहनांची खूप मोठे नुकसान झाले आहे.
ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाल्याने ट्रॅक्टर मधील पूर्ण डिझेल पेट्रोल पंपच्या परिसरात पसरले त्यामुळे सुमारे एक तास पेट्रोल पंप परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती.क्रेनच्या साहाय्याने तुटलेले ट्रॅक्टरचे तुकडे व कारला बाजूला करण्यात आले.उशिरा मनीष पेट्रोल पंपाच्या परिसरात पडलेले डिझेल सफाई करण्याचे काम सुरू होते.