नंदुरबार ! प्रतिनिधी
पाऊस व्यवस्थित पडत नसल्याने शेतात पीक आले नाहीये . तसेच बँकेतील कर्जाच्या ओझामुळे आराळे ता.नंदुरबार येथील वृद्ध शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे . यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे बळीराजा चांगलाच संकटात सापडला असून , आठवड्यात शेतकरी आत्महत्येची ही दुसरी घटना आहे .
नंदुरबार तालुक्यातील आराळे येथे सुदामसिंग बारकूसिंग जाधव (वय ७१) यांची सुमारे अडीच एकर इतकी शेती आहे. दरवर्षी निसर्गाचा लहरीपणा, कधी अवकाळी तर कधी गारपीट यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होते. अपेक्षित उत्पन्न येत नसल्याने दिवसेंदिवस कर्जाचा डोंगर वाढत होता. गेल्या तीन ते चार वर्षापासून यावर्षी तरी समाधानकारक उत्पन्न येणार अशी अपेक्षा सुदामसिंग जाधव यांना होती. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पन्न येत नसल्याने जाधव हतबल झाले होते. उदेसिंग व सुनिल अशी सुदामसिंग यांना दोन मुले आहेत. दोघांचे लग्न झाले असून मुलबाळं आहेत. घरात सुदामसिंग राजपूत यांची आई आहे. मोठा परिवार असल्याने व मोजकीच शेती असल्याने उदरनिर्वाह चालविणे कठीण होते. त्यातच निसर्गाच्या लहरीपणामुळे दिवसेंदिवस शेतीच्या उत्पन्नात घट येत होती. यामुळे मोठा मुलगा उदेसिंग शेती करत असून लहान मुलगा सुनिल हा उदरनिर्वाहासाठी सुरत येथे गेला होता. आराळे शिवारातील शेतीत राबराब राबूनही उत्पन्न येत नाही. त्यातच सुदामसिंग जाधव यांना पायाचा असणारा त्रास आणि त्यामुळे होणाऱ्या वेदना आणखीनच असह्य झाल्या होत्या. यामुळे काल दि.३० जुलै रोजी सुदामसिंग जाधव यांनी कुटूंबिय सगळे घरात झोपलेले असतांना पहाटे उठून राहत्या घरातच गळफास घेवून जीवनयात्रा संपविली. सकाळी उठल्यावर सुदामसिंग यांनी गळफास घेतल्याचे कुटूंबियांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी एकच आक्रोश केला. सुदामसिंग जाधव यांना जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मयत घोषीत केले. याबाबत नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत सुदामसिंग जाधव यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, सुना, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.