नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार- महाराष्ट्रात गुटखा विक्रीला बंद असतांना देखील नंदुरबार जिल्ह्यात खुलेआम गुटखा विक्री सुरु आहे. गुजरात राज्यातून विमल गुटखा आणून नंदुरबारात गोडावुनमध्ये साठवणुक केला जात आहे. शासनाच्या नियमांना तिलांंजली देवुन सर्रासपणे होणार्या विमल गुटख्या विक्रीवर कारवाई करुन प्रतिबंध घालण्यात यावा, अशी मागणी नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक व अन्न-औषध प्रशासन विभागाचे अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासुन विमल गुटख्यांची तस्करी व विक्री मोठ्या प्रमाणावर फोफावली आहे. महाराष्ट्र राज्यात गुटखा विक्री व साठवणुकीला प्रतिबंध असतांना देखील गुजरात राज्यातील निझर येथुन गुटखा आणून नंदुरबार शहरात बेकायदेशीर रित्या साठवणुक केला जात आहे. तसेच शहरात ठिकठिकाणी खुलेआम गुटखा विक्री सर्रासपणे सुरु आहे. नंदुरबारातील बहुचर्चित व्यापारी हा निझर येथून गुटखा आणून शहरात पुरवठा करीत आहे. यामुळे शहरातील सिंधी कॉलनी, दोशाह तकीया, नेहरु चौक, मनियार मोहल्ला, मारवाडी गल्ली गांधी नगर, अमर टॉकीज याठिकाणी गुटखा तस्करी सर्रासपणे सुरु आहे. याकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष दिसुन येत असून गुटखा विक्री मोठ्या प्रमाणावर फोफावली आहे. म्हणुन सदर गुटखा विक्रीवर कारवाई करुन प्रतिबंध घालण्यात यावा, अशी मागणी मनसेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय विश्वनाथ चौधरी, नंदुरबार तालुकाध्यक्ष राकेश माळी, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुनिल कोकणी, प्रसिध्दी प्रमुख कल्पेश माळी, संतोष पेंढारकर आदींनी निवेदनातून केली आहे.








