अक्कलकुवा l प्रतिनिधी
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आशीर्वादाने नंदुरबार शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांच्या विशेष प्रयत्नातून नंदुरबार जिल्ह्यासाठी
रोजगार हमी व फलसंवर्धन मंत्री मा.ना.संदिपान भुमरे यांनी ६ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.
मंत्रालयात नंदुरबार जिल्ह्यातील विकास कामांचे मंजुरीचे पत्र रोजगार हमी मंत्री मा.ना.संदीपान भुमरे यांच्या हस्ते आणि धुळे व नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या उपस्थितीत शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांना देण्यात आले.
सन २०२१-२०२२वर्षातील अकुशल घटकाचा अनुज्ञेय कुशल घटकांतर्गत नंदुरबार जिल्ह्यासाठी ६ कोटी रुपयाचा निधी शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांच्या विशेष प्रयत्नातून मिळाला आहे यात नंदुरबार तालुक्यासाठी १ कोटी, शहादा तालुका १ कोटी रुपये, धडगाव तालुका २ कोटी रुपये तर अक्कलकुवा तालुक्यासाठी २ कोटी असे एकूण ६ कोटी रुपयांचा सिमेंट रस्ते, पेव्हर ब्लॉक, सीएनबी स्मशानभूमी इत्यादी कामांसाठी रोजगार हमी व फलसंवर्धन मंत्री मा.ना.संदीपान भुमरे यांनी मंजूरी दिली.यावेळी नंदुरबार विधानसभा संपर्कप्रमुख आदिनाथ कोरडे, शहादा विधानसभा संपर्कप्रमुख दिपक साळवे, नंदुरबार उपजिल्हा संघटक मधुकर मिस्तरी आदी उपस्थित होते. नंदुरबार जिल्ह्यासाठी मिळालेल्या विकास निधीमुळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. अनेक गावात विकासाला चालना मिळणार आहे.