म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील मलगाव,लंगडी ,गोटाळी या भागात आज वादळ, वाऱ्यासह तुफान गारपीट होवून उन्हाळी पिकांसह कौलारू घरांचे प्रचंड नुकसान झाले असून काही ठिकाणी पत्रे उडाली आहेत.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, शहादा तालुक्याच्या पूर्व आदिवासी डोंगराळ भागात असलेल्या लंगडी , मलगाव , गोटाळी भागात आज सायंकाळ च्या सुमारास अचानक वादळाला सुरुवात झाली. वादळ पाठोपाठ जोरदार पाऊस यायला लागला. नंतर तुफान गारपीट सुरु झाली . अचानक झालेल्या गारपिटीमुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. सुमारे अर्धा तास पाऊस व गारपीट सुरु होती. या गारपीट मुळे उन्हाळी भुईमूग, मूग, कांदा पिकाचे महागडे रोपे , चारा यांना मोठा फटका बसला. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच कौलारू घरांसह काही घरांचे पत्रे उडाली आहेत. काही ठिकाणी झाडे पडली. एका शेतकऱ्याचे केळी पिकाचेही नुकसान झाले. संध्याकाळ झाल्याने अजून काय काय व कुठे कुठे नुकसान झाले आहे ते उशिरा पर्यंत माहिती उपलब्ध झाली नव्हती.