तळोदा l प्रतिनिधी
तळोद्यातील पंचवीस वर्षीय तरुणाने कोरोनाने उध्वस्त केलेल्या सोनार समाजातील तरुण विधवा महिलेचा संसार पुन्हा फुलवण्यासाठी पुढाकार घेवून तिच्याशी विवाह केला. एवढेच नव्हे तर तिच्या चार वर्षीय मुलीलाही त्याने स्विकारले आहे. हा आदर्श विवाह गुरुवारी सामाजिक रूढी परंपराना फाटा देत पार पडला. या आदर्श विवाहाचे जिल्ह्यात कौतुक केले जात आहे.
लहान शहादा (ता.नंदुरबार) येथील सोनार समाजातील ऐश्वर्या अक्षय सोनार हिचा अक्षय संजय सोनार यांच्याशी सन २०१६ मध्ये विवाह झाला होता. त्यांचा संसार अतिशय सुखाने सुरू होता. त्यांचा संसार वेलीवर स्वरा नावाची चार वर्षीय कळी देखील उमलली. परंतू गेल्या वर्षी कोरोनाच्या महामारीने तिच्या संसार उध्वस्त केला. या महामारीत पती अक्षयचे निधन झाले. त्यामुळे तारुण्यात तिच्या नशीबी वैधव्य आले. तसेच चार वर्षाचा मुलीचा सांभाळ व शिक्षण याच्या काळजीने ती अतिशय चिंताग्रस्त होती. तिच्यावर आलेल्या या संकटाचा विचार करून तिचा संसार पुन्हा फुलवावा अशा व्यापक स्तुत्य तळोदा शहरातील सोनार समाजातील प्रतिष्ठित, श्रीमंत घराण्यातील पंचवीस वर्षीय तरुण संदीप प्रवीण सोनार याने तिच्याशी विवाह करण्याचा प्रस्ताव आपल्या कुटुंब व समाज पदाधिकारी यांच्यापुढे मांडला. त्यांनीही त्याच्या प्रस्तावास मान्यता देत हा प्रस्ताव ऐश्वर्याचा आई, वडील, तीचे सासरे, नातेवाईकांपुढे ठेवला. परंतू मुलीचा विचार तिला सतावत होता. त्यामुळे विवाहाचा प्रस्ताव तिने प्रारंभी नाकारला. मात्र नातेवाईकांनी तिची समजूत काढत मुलीलाही स्वीकारण्याची अट मांडली. संदीपने देखील तिच्या मुलीला विना अट स्वीकारले. त्यामुळे ही सोयरिक निश्चित झाली. गुरुवारी हा आदर्श विवाह सोनार समाजाच्या रीती रिवाजानुसार कोरोनाचे शासकीय नियमांचे पालन करून पार पडला. विवाहास समाजाचे पदाधिकारी, समाज बांधव उपस्थित होते. उध्वस्त झालेल्या विधवा तरुणीचा संसार पुन्हा संदीपने फुलवल्याने त्यांचे समाजात कौतुक केले जात आहे.