तळोदा l प्रतिनिधी
येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डॉ.गौतम एम.मोरे यांना महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्रा मार्फत चालविण्यात येणाऱ्या ‘करियर कट्टा’च्या वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट जिल्हा समन्वयक पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री माननीय उदय सामंत यांच्या हस्ते दि. 25 फेब्रुवारी रोजी मुंबई विद्यापीठात केले जाणार आहे.
करियर कट्टा या उपक्रमांतर्गत आयएएस आपल्या भेटीला व उद्योजक आपल्या भेटीला हे उपक्रम महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राबवले जातात. या अंतर्गत युपीएससी एमपीएससी,बँकिंग व इतर स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केले जाते तर उद्योजक आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील महाविद्यालयीन युवकांना उद्योग जगताचे मार्गदर्शन केले जाते. या दोन्ही प्रकारात महाराष्ट्रातील तरुणांचा वाटा वाढवा म्हणून मा.मंत्री उदय सामंत यांनी करियर कट्टा चालवण्यास प्रोत्साहन दिले आहे .या उपक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष 2021 – 22 या वर्षात राज्यभरात विविध उपक्रम घेण्यात आले. तळोदा महाविद्यालयातील प्रा. गौतम एम. मोरे यांची नंदुरबार जिल्हा करियर कट्टा समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी वर्षभरात जिल्ह्यामध्ये राज्य समन्वयक माननीय यशवंत शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवले आणि अंमलबजावणी केली. करोना काळातही विविध मार्गाने करियर कट्टा जिल्ह्यामध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न केले. याची दखल घेऊन राज्य स्तरीय निवड समिति मार्फत विविध उपक्रमांचे परीक्षण करून प्रा. मोरे यांची राज्यस्तरीय उत्कृष्ट जिल्हा समन्वयक म्हणून निवड करण्यात आली. पुरस्कार निवडीबद्दल करिअर कट्टाचे राज्य समन्वयक माननीय यशवंत शितोळे साहेब, संस्थेचे अध्यक्ष भरत माळी, उपाध्यक्ष सुधीरकुमार माळी, विभागीय समन्वयक डॉ. सचिन नांद्रे, प्राचार्य डॉ. एस. आर. मगरे यांनी प्रा. मोरे यांचे अभिनंदन केले. तसेच करियर कट्टा मार्फत महाविदयालयास विभागीय स्तरावर उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे. या दोन्ही कारणाने महाविद्यालयाचा गौरव झाल्याने महाविद्यालयाचे प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी प्रा. मोरे यांना शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.