नंदुरबार l प्रतिनिधी
विस्थापितांना संघटीत करुन प्रस्थापित करण्यासाठी दीन, दलित, बहुजन समाजातील होतकरु समाजसेवेत सक्रीय कार्यकर्त्यांना संघटीत करुन पक्ष संघटन उभारावे. वाईस विक्रीस आमचा विरोध असल्याचे सांगून जातनिहाय जनगणनेस राष्ट्रीय समाज पक्ष आग्रही आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी नंदुरबार येथे केले.
नंदुरबार जिल्हा राष्ट्रीय समाज पक्षातर्फे शाखा उद्घाटन, आढावा बैठक तसेच कार्यकारिणीची निवड करुन जिल्ह्यातील पदाधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली. आढावा बैठकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते तसेच मुख्य महासचिव ज्ञानेश्वर माऊली सलगर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांनी आगामी २०२४ मध्ये महाराष्ट्रात पक्षाचे पाच खासदार व पन्नास आमदार निवडून आणण्यासाठी व्यूहरचना, नियोजन केले जात आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष मुकेश राजपूत यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, जिल्ह्यात राष्ट्रीय समाज पक्षाला बळकट करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक युवकांपर्यंत राष्ट्रीय समाज पक्षाची विचारधारा पोहोचविण्याचे काम केले जाईल. नंदुरबार येथील कुरेशी मोहल्ला येथे मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच विविध पदाधिकार्यांची नियुक्ती करुन मान्यवरांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी नंदुरबार जिल्हा प्रभारी मखाआप्पा कोळेकर, जिल्हा महासचिव अरशी अहमद शेख युनुस कुरेशी, जिल्हा सचिव सिराजोद्दीन ऍनोद्दिन शेख, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष वसीम अब्दुल फरीम खाटीक, उपाध्यक्ष जुबेद शेख मोहम्मद हुसेन, नंदुरबार शहर अध्यक्ष सुनिल कोळी, उपाध्यक्ष मलक अक्षर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.