नंदुरबार | प्रतिनिधी-
ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत कार्यान्वित नळ जोडणीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत दि.२२ जुलै ते ७ ऑगस्ट २०२१ दरम्यान गाव कृती आराखडा पंधरवाडा अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये गावपातळीवर नळ जोडणीचा गाव कृती आराखडा तयार करण्यात येईल. या पंधरवाडा अभियानात जिल्हा, तालुका व गाव पातळीवर सर्वांनी सहभाग घेऊन पंधरवाडा अभियान यशस्वीरित्या राबविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.
अभियान कालावधीत पहिल्या टप्प्यात जल जीवन मिशन राज्य पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने ग्रामीण पाणीपुरवठयाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता, डाटा एंट्री ऑपरेटर तसेच जिल्हा कक्षाच्या सनियंत्रण मूल्यमापन सल्लागार यांना झूम ऍ द्वारे गाव कृती आराखडा बाबत प्रशिक्षण देण्यात येईल. यामध्ये गाव कृती आराखडयामधील माहितीचे संकलन, राबविण्याच्या प्रक्रिया, कोबो टूलद्वारे माहिती अपलोडबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दुसर्या टप्प्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत, उपअभियंता, शाखा अभियंता, भूवैज्ञानिक, मनुष्यबळ विकास सल्लागार, सनियंत्रण व मूल्यमापन सल्लागार, पाणी गुणवत्ता सल्लागार व तालुकास्तरावरील गट विकास अधिकारी विस्तार अधिकारी, उप अभियंता, शाखा अभियंता, गट समन्वयक, समूह समन्वयक यांना झूम ऍपद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
तालुका पातळीवर गटविकास अधिकारी दि.२८ ते ३१ जुलै दरम्यान प्रशिक्षणाचे आयोजन करतील. यामध्ये गाव कृती आराखडयाबाबत सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक, पंप ऑपरेटर, आशा वर्कर, ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीची दोन प्रतिनिधींना झूम ऍपद्वारे प्रशिक्षण देतील. गाव पातळीवर १ ते ३ ऑगस्ट या कालावधीत गाव कृती आराखडाच्या अनुषंगाने लागणारी माहिती कोबो टूल साधनाचा वापर करून संकलित करण्यात येईल. दि.५ ते ७ ऑगस्ट दरम्यान प्राप्त माहितीवरून गाव कृती आराखडाची निर्मिती व गाव कृती आराखडा पडताळणी प्रक्रिया करण्यात येऊन १५ ऑगस्ट २०२१ रोजी होणार्या ग्रामसभेमध्ये मंजुरीकरिता कार्यक्रम पत्रिकेवर ठेवण्यात येणार आहे.
गाव कृती आराखडा पंधरवड्यात जिल्हा कक्षातील तज्ञ सल्लागार तालुका पातळीवरील गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत उपअभियंता, शाखा अभियंता गावपातळीवर ग्रामसेवक, जलसुरक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी सहभाग घेऊन गाव कृती आराखडा अभियान यशस्वीरित्या राबविण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.वर्षा फडोळ, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पी.आर.दरेवार यांनी केलेआहे.