म्हसावद l प्रतिनिधी
पंतप्रधान आवास योजनेच्या 13 जाचक अटींपैकी 3 अटी रद्द करण्याबाबतचे निवेदन बिरसा फायटर्स शहादा मार्फत गटविकास अधिकारी, शहादा यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, सध्या केंद्र शासनाने प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेच्या प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांना लाभ देण्यासंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार १३ जाचक अटी व शर्ती लागू केलेल्या आहेत.यात कुटुंबात दूरध्वनी/दुचाकी असणे/१० हजारपेक्षा जास्त उत्पन्न असणे इत्यादी बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे.या अटी बघता शासनाला लाभार्थ्यांना घरकुल देण्या संदर्भात मानसिकता दिसून येत नाही.
खेड्या-पाड्यावर राहणाऱ्या लोकांसाठी आपत्कालीन वेळेस दूरध्वनी व दुचाकी हे आजच्या काळातले संजीवनी म्हणून काम करतात.म्हणून माणूस कितीही गरीब असला,तरीही कुटुंबाच्या हितासाठी वरील दोन वस्तू अत्यावश्यक गरज म्हणून घ्यावेच लागतात.तसेच एक वेटर म्हणून जरी एखाद्या हॉटेलात/खानावळमध्ये काम केले,तरीही त्याला मासिक पगार १२ ते १५ हजार रु मिळतो.वरील तिन्ही अटींचा विचार केल्यास ७०-८० टक्के लाभार्थी हे लाभापासून वंचितच राहतील.
सदरच्या १३ अटीन्पैकी वरील ३ अटी या दैनंदिन जीवनात जीवनावश्यक आहेत.तरी या अटी त्वरित रद्द करण्यात याव्यात,यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करून घरकुलापासून वंचित राहणाऱ्या लाभार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी बिरसा फायटर्स शहादा तालुका अध्यक्ष संतोष वळवी, गौतम खेडकर, अक्षय ठाकरे यांनी केली आहे.










