नंदुरबार | प्रतिनिधी
प्रत्येक पक्ष किंवा संघटनेत पद मिळविण्यापेक्षा कार्याला महत्त्व देऊन प्राधान्य दिले पाहिजे. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लढा देणे गरजेचे आहे. समन्वयाचा अभाव असल्यामुळे अनेक जण संघटित होत नसल्याची खंत बहुजन वंचित आघाडीच्या धुळे व नंदुरबार जिल्हा निरीक्षक नाशिक येथील दिशा पिंकी शेख यांनी व्यक्त केली.
शहरातील नवापूर चौफुलीवरील देव मोगरा माता मंदिर सभागृहात आयोजित बहुजन वंचित आघाडीच्या संवाद बैठकीत दिशा पिंकी शेख बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर बहुजन वंचित आघाडीचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा नंदुबार जिल्हाध्यक्ष अरुण रामराजे, सुनील सूर्यवंशी, नाना ठाकरे, भिमराव अहिरे, उद्धव पिंपळे, राजेश मेटकर, रेखा बैसाने आदी उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अरुण रामराजे यांनी पक्षाच्या वाटचाली संदर्भात प्रास्ताविकातून माहिती दिली.यावेळी पुढे बोलताना निरीक्षक दिशा पिंकी शेख म्हणाल्या की, धुळे नंदुरबार जिल्हा चळवळीचे उगम स्थान असून वंचित बहुजन आघाडीची बांधणी प्रभावीपणे करणे आवश्यक आहे .धुळे नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे प्रश्न, बेरोजगारी समस्या आदींवर युवा आघाडीने मंथन करावे. प्रामाणिकपणे कार्य करणे आणि आपसात ताळमेळ असणे आवश्यक असल्याचे मत दिशा शेख यांनी व्यक्त केले. त्या पुढे म्हणाल्या की, राजकारण ही जत्रा आहे. राजकीय नैतिकता असल्यास पक्षाशी एकनिष्ठ राहावे. पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करीत असताना राजकारणातील खाचखळगे यांचा मी अनुभव घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खर्या अर्थाने तळागाळातील व्यक्तींना न्याय देण्यासाठी आपली ध्येय धोरणे निश्चित केली आहे. आणि या धोरणांच्या प्रेरणेतून कार्य सुरू आहे. असेही शेवटी दिशा शेख यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दिनेश सामुद्रे यांनी केले.










