सारंगखेडा l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील टेंभा बुद्रूक येथे ट्रान्स्फॉर्मरवरील वीज वाहिनीची तार तुटून झालेल्या शॉर्ट सर्किटनंतर लागलेल्या आगीत ७५ एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना आज दि.7 फेब्रुवारी दुपारी दोन वाजता घडली .याआगीत १३ शेतकऱ्यांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे . घटनास्थळी शहादा येथील सातपुडा , समशेरपूर येथील आयान साखर कारखान्याचे शेतकी अधिकाऱ्यांनी भेट देऊन तात्काळ ऊस तोडणी यंत्राद्वारे ऊस तोडणी सुरू केली आहे .
टेंभा येथील वसंत बन्सी पाटील , हेमंत छोटूलाल पाटील , जगतसिंग रजेसिंग गिरासे , मनिषाबाई जगतसिंग गिरासे , उमेश शिवदास पाटील , राजेंद्र रामदास पाटील , दिवाणसिंग दौलतसिंग गिरासे , बापूसिंग नागोसिंग गिरासे , अशोक गुलाल पाटील , रमेश दामू पाटील , पुरुषोत्तम वल्लभ पाटील , विलास बन्सीलाल पाटील , दौलतसिंग सुरतसिंग गिरासे या शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाला आहे . ही घटना सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली . या उसाच्या क्षेत्रावरून वीज वाहक तारा गेल्या आहेत तर काही ठिकाणी या तारा हाताच्या उंचीप्रमाणे लोंबकळत आहे . वीज वाहक तार तुटल्याने ठिणग्या उसाच्या फडात पडल्याने उसाने पेट घेतला .आगीची तीव्रता अधिक असल्याने दोन तासात ७५ एकर उसाचे क्षेत्र खाक झाले . या आगीमुळे शेतकऱ्यांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले . अनेक शेतकऱ्यांच्या ठिबक सिंचन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले . घटनास्थळी तात्काळ समशेरपूर येथील आयान शुगरचे मुख्य शेतकी अधिकारी ए .आर. पाटील , शहादा येथील सातपुडा साखर कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी अजित सावंत यांनी पाहणी करून दोघी साखर कारखान्याचे ऊस तोड यंत्राद्वारे उस तोडणी सुरू केली आहे . यावेळी ऊसतोडणी गटातील शहाजी देसले , श्री .गिरासे , श्री . बोरसे आदी उपस्थित होते .