अक्कलकुवा l प्रतिनिधी
सोरापाडा ता.अक्कलकुवा येथील श्री महाकाली माता देवीच्या यात्रेला १०० वर्षाच्या परंपरेला कोरोना महामारीमुळे खंड पडला होता.मात्र यावर्षी १६ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२२ रोजी कोरोनाचे नियम पाळत यात्रा भरवण्यात येणार असल्याची माहिती विश्वस्त मंडळाने दिली आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथे नवसाला पावणारी महाकाली मातेची यात्रा माघ शुद्ध पौर्णिमेला भरवण्याची शतकी परंपरा आहे मात्र कोरोनाच्या वैश्विक महामारीमुळे गेल्या दोन वर्षापासून शासनाने यात्रा भरविण्यावर निर्बंध लावले होते.परिणामी दोन वर्षा पासुन अक्कलकुवा तालुक्यातील कोणतीच यात्रा भरली नाही त्यामुळे बैल व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या यात्रेत कोट्यवधी रुपयांच्या उलाढाली ठप्प झाल्या होत्या. सलग २ वर्षा पर्यंत यात्रा न भरल्यामुळे त्याचा थेट फटका शेतकरी व व्यावसायिक यांना बसला होता.अनेक कुटुंबे ही घरादारासाठी लागणारी साहित्ये तसेच शेतकरी वर्ग आपल्या शेती उपयोगी साहित्याची खरेदी हे विशेषतः यात्रेतच करीत असतात त्यामुळे कोट्यवधीच्या वस्तुंची खरेदी विक्री ही यात्रेत होत असते.मात्र यात्रा न भरल्याने शेकडो कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच्या संसाधनाना तसेच उत्पन्नाला खीळ बसली होती.त्याचाच विचार करुन जनतेची गरज आणि मागणी लक्षात घेऊन यावर्षी श्री महाकाली माता मंदिर विश्वस्त मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन यात्रा भरवण्या विषयी विनंती केली होती त्यानुसार विश्वस्त मंडळाची दि.३ रोजी मंदिराच्या प्रांगणात बैठक संपन्न झाली. या बैठकीत शासनाने दि. १ फेब्रुवारी रोजी निर्गमित केलेल्या नियमावली नुसार कोरोना नियमांचे पालन करुन यात्रा भरवण्याचे निश्चित करण्यात आले आहे त्यामुळे दुकानदार, हॉटेल व्यावसायिक, खेळण्या विक्रेते, पाळणा व्यावसायिक यांनी यात्रेत आप आपले व्यवसाय आणुन उपस्थिती द्यावी असे आवाहन विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे
विश्वस्त मंडळाच्या बैठकीला विश्वस्त मंडळाचे उपाध्यक्ष पृथ्वीसिंह पाडवी,सचिव किशोर हिरे,विश्वस्त आमश्या पाडवी,खजिनदार विजय सोनार विश्वासराव मराठे, रुपसिंग पाडवी, कपिलदेव चौधरी, विक्रमसिंह चंद्रवंशी,भिकमचंद चव्हाण,विनोद बनिया,गणेश माळी,ज्ञानेश्वर जोशी,कालिदास लोहार,आदी उपस्थित होते.