नंदुरबार ! प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदातर्फे तळोदा येथे आयोजित कार्यक्रमात राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते खावटी अनुदान योजनेअंतर्गत अन्नधान्य, कडधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला जि.प.अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मैनक घोष, माजी मंत्री पद्माकर वळवी, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक मनिषा पवार, तहसीलदार गिरीश वखारे, दिलीप नाईक आदी उपस्थित होते.
ॲड. पाडवी म्हणाले, तांत्रिक अडचणींमुळे योजनेचा लाभ न मिळालेल्या आदिवासी बांधवाना लाभ देण्यासाठी संबंधिताना सूचना देण्यात येतील. तळोदा शहरातील घरकुल योजनेसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत शासन स्तरावर प्रयत्न केला जाईल व त्यासाठी आवश्यक निधी देण्यात येईल. आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या गणवेश शिलाईचे काम स्थानिकांना उपलब्ध करून देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात श्री.घोष यांनी खावटी अनुदान योजनेची माहिती दिली. नंदुरबार जिल्ह्यात 1 लाख 55 हजार कुटुंबांना या योजनेचा लाभ होणार आहे. 31 कोटी रुपये त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. तळोदा प्रकल्पांतर्गत तळोद्यातील 19 हजार 861, अक्कलकुवा 33 हजार 827, धडगाव 29 हजार 766 असे एकूण 83 हजार 454 कुटुंबांना योजनेचा लाभ होणार आहे. आतापर्यंत 80 हजार 292 लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे पहिल्या टप्प्यातील रुपये 2000 प्रमाणे 16 कोटी 6 लक्ष रुपये वर्ग करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते.