तळोदा l प्रतिनिधी
तळोदा येथील बालाजी पेट्रोल पंपच्या समोरील कापड प्रक्रियेचा पत्र्याचा दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत लाखोची मशिनरी व विक्रीसाठी तयार केलला माल जळून खाक झाले आहे. दरम्यान घटनास्थळी तहसिलदार गिरीश वखारे यांनी भेट देऊन पंचनामा करण्याचे आदेश तलाठी यांना दिले आहेत.

शहरातील बालाजी पेट्रोल पंप समोर इम्रान छोटू मणियार, अजहर हाजी अकबर, पिंकू पिंजारी यांचे कापड (चिंधी) पासून कापूस बनविण्याचा व टाकाऊ प्लास्टिक पासून दोरी बनविण्याचे कारखाना आहे. दुपारी २ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किट होऊन या कारखान्याला अचानक आग लागली. यात कारखान्याचे मशिनरी व विक्रीसाठी तयार केलेले माल व इतर साहित्य जळून कोळसा झाले. या घटनेमुळे व्यापाऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने पत्र्याचे शेड बाहेर ओढून काढण्यात आले. शेजारी असलेले मोईमखा मुजीबखा पठाण यांच्या राहत्या घराला देखील आगीने पेट घेतला. आगीमुळे घरातील जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या आहेत. आगीमुळे उठणारे धुरीचे लोळ पाहून मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमली.
आग विझवण्यासाठी प्रभाग २ चे नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, संदीप परदेशी, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष योगेश मराठे, नगरसेवक गौरव वाणी, जितेंद्र सूर्यवंशी, कल्लु अंसारी, सुभाष चौधरी, प्रदीप शेंडे, दीपक चौधरी, जगदीश परदेशी, मतीन शेख, बबलू बागवान, नुरू कुरेशी, आदिल शेख, गुडुर मणियार, फैजान मूनसी, अयाज पठाण, साहिल शेख, सोनू सय्यद, कमलेश पाडवी, नदीम पिंजारी, भाजपा शहर अध्यक्ष योगेश चौधरी, अमनुदिन शेख, अकबर हिदायात, नदीम बागवान, योगेश पाडवी, राजू पाडवी यांच्यासह परिसरातील नागरिकांच्या मदतीने आग विझवण्यात यश आले. घटनेची माहिती मिळताच तहसिलदार गिरीष वखारे घटनास्थळ गाठले व मंडळ अधिकारी समाधान पाटील, तलाठी बळीराम चाटे यांना पंचनामा करून नुकसान भरपाई बाबतचा प्रस्ताव त्यांनी सादर करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी मोड तलाठी राजेश पवार उपस्थित होते. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी सहायक पो.नि अमितकुमार बागुल व अविनाश केदार यांनी परिश्रम घेतले.








