नंदुरबार l प्रतिनिधी
कोरेाना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच नव्याने आलेल्या ‘ओमायक्रॉन’ या विषाणूच्या पार्श्वभूमीवर आणि संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात 8 ते 10 डिसेंबर, 2021 या कालावधीत ‘कोविड-19’ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेत नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभागी होत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात ‘कोविड- 19’ लसीकरण मोहिमेला गती देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर तीन दिवसीय मोहीम राबविण्यात येईल. या मोहिमेत आरोग्य विभागासह लोकप्रतिनिधी, महसूल, पोलिस विभागासह शासनाचे सर्व विभाग, सामाजिक, स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे.
या मोहिमेची माहिती देताना जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी सांगितले, आठ ते दहा डिसेंबर 2021 या कालावधीत आरोग्य विभागातर्फे ग्रामीण व शहरी भागात विशेष लसीकरण शिबिर होईल. या शिबिराच्या माध्यमातून लसीकरण मोहीम सातपुडा पर्वतातील पाड्या- पाड्यांपर्यंत पोहोचविण्यात येईल. त्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी लसीकरण करून घेत सहकार्य करावे.
या मोहिमेत नंदुरबार जिल्ह्यातील ज्या नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतलेला नाही, त्या नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात येईल. तसेच दुसरा डोससाठी जे नागरिक पात्र असतील त्यांचेही लसीकरण करण्यात येईल. या विशेष मोहिमेंतर्गत प्रत्येक व्यक्तिंपर्यत पोहोचण्याचे नियेाजन जिल्हा प्रशासनाने केले असून या विशेष लसीकरण शिबिरात 18 ते 44 वर्षे वयोगटातील 4 लाख 13 हजार 944 व्यक्तींना, तर 45 वर्षावरील 1 लाख 47 हजार 601, तसेच 2 हजार 28 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस देण्याचे नियेाजन करण्यात आले आहे.
नागरिकांना पहिला डोस देण्याकरिता सर्व विभागांना तालुकानिहाय उद्दिष्ट देण्यात आले आहे. ते असे : नंदुरबार (72,000), नवापूर (62,000), शहादा (92,000), तळोदा (34,000), अक्कलकुवा (78, 000) तर धडगावसाठी (67000) असे आहे. लसीकरणासाठी तालुकानिहाय नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. लसीकरणासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी दवंडी देणे, गृहभेटी, सार्वजनिक ठिकाणी तसेच समाज माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. लसीकरणासाठी उपजिल्हाधिकारी समकक्ष अधिकाऱ्यांचे भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहे. भरारी पथकामार्फत विशेष मोहिमेच्या दिवशी कुठल्याही तालुक्यातील गावात जावून हे पथक लसीकरण केंद्राला भेट देणार आहे. त्याचबरोबर लसीकरणासाठी प्रत्येक तालुक्यास पुरेसा कोविशिल्ड व कोव्हक्सिन लसीचा व सीरिंजचा साठा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश आरोग्य विभागास देण्यात आले आहेत.
‘कोविड-19’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. कोविड- 19 च्या नियंत्रणासाठी लसीकरण करणे महत्वाचे आहे. त्यासाठी आरोग्य कर्मचारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधींसह, सरंपच, तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, स्वयंसेवी कार्यकर्ता, पत्रकार, सामाजिक संस्थांनी नागरिकांना लसीकरणाचे महत्व समजावून सांगून लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे व लसीकरण मोहिमेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी केले आहे.
*कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच लसीकरण मोहीम : पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी*
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. त्यातच ‘ओमायक्रॉन’ हा कोरोनाचा नवीन प्रकार आला आहे. त्याच्या संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या तरी लस हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक पात्र नागरिकाने लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठीच तीन दिवसीय मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. या मोहिमेला नंदुरबार जिल्हावासीयांनी स्वयंस्फुर्तीने पुढे येऊन प्रतिसाद देत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दूर ठेवण्यास सहकार्य करावे. तसेच नागरिकांनी नियमितपणे मास्क वापरावा, दोन व्यक्तींमध्ये सहा फुटांचे शारीरिक अंतर ठेवावे. तसेच हात वेळोवेळी साबणाने किंवा सॅनेटायझरने स्वच्छ धुवावेत, असे आवाहन नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी केले आहे.








