नंदुरबार l प्रतिनिधी-
पथराई ता. नंदुरबार येथील के. डी. गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीर पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच हल्ल्यात बळी पडलेल्या निरपराध नागरिकांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य शरद पाटील होते, तर शिक्षण निदेशक नरेंद्र बागुल यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अमर जवान स्मारक प्रतिकृतीस पुष्पचक्र अर्पण करून शहिदांना आदरांजली वाहण्यात आली.
शिक्षण निदेशक नरेंद्र बागुल यांनी विद्यार्थ्यांना २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याची माहिती देत शहीद पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या शौर्याचा आणि देशसेवेतील त्यागाचा परिचय करून दिला. प्राचार्य श्री. पाटील यांनी जवानांचे धैर्य, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रप्रेम हे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्राप्रती कर्तव्यभावनेची जाणीव निर्माण करण्यात आली.
याप्रसंगी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रवीण मोरे व नरेंद्र बागुल यांनी केले.







