नंदुरबार l प्रतिनिधी-
डॉ. विजयकुमार गावित यांनी मंत्री असताना सतत पाठपुरावा करून नर्मदा-तापी वळण योजनेला प्रशासकीय मान्यता आणि 800 कोटी रुपये निधीची मान्यता मिळवली होती. योजना पूर्णत्वास आणून शेती विकासातून आणि सिंचनातून नंदुरबार जिल्ह्याचा कायापालट घडवावा, हे आमचे पूर्वीपासूनचे स्वप्न आहे. आता नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री मा. हसन मुश्रीफ यांच्या विशेष प्रयत्नांमुळे योजनेला 5 हजार 548.04 कोटी रुपये खर्चास मंत्रिमंडळाने प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आणि त्या स्वप्नपूर्तीला गती मिळाली म्हणून जिल्हा वासियांच्या वतीने राज्य सरकारचे तसेच पालकमंत्री माननीय हसन मुश्रीफ यांचे शतशः आभार मानते; या शब्दात माजी खासदार संसद रत्न डॉक्टर हिना गावित यांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आपल्या राजकीय कार्यकाळात नर्मदा तापी वळण योजनेची संकल्पना सरकार दरबारी मांडण्यापासून त्याचा सर्वे करून घेण्यापर्यंत सर्व पूर्तता करून घेण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. हे सर्वश्रुत आहे. त्याचप्रमाणे 2022 ते 2024 दरम्यान डॉक्टर हिना गावित यांनीही खासदार असताना वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला होता आणि त्याच कालावधीत आदिवासी विकास मंत्री असताना डॉ. विजयकुमार गावित यांनी तत्कालीन फडणवीस सरकारकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करून नर्मदा-तापी वळण योजनेला ८०० कोटींची मान्यता मिळवली होती. या सर्व पार्श्वभूमीवर माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी देखील 5549 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, नंदुरबार जिल्ह्यातील शेतीचा विकास व्हावा, पाणी नियोजन प्रभावी बनवून औद्योगिक विकासाला चालना द्यावी आणि प्रत्येक गावाचा विकास व्हावा; या दृष्टीने आम्ही सतत प्रयत्नशील राहिलो आहोत. याच संदर्भाने नर्मदा तापी वळण योजनेचा आम्ही राज्य सरकारकडे आग्रह लावून धरलेला होता. योजनेला वारंवार अडथळे येत राहिले. तथापि आता पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नांतून योजनेला 5 हजार 548.04 कोटींची प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याने पुढे वळण योजनेची सर्व कामे वेगाने काम पार पाडवी ही अपेक्षा आहे. नंदुरबारच्या सिंचन व शेती विकासाच्या स्वप्नपूर्तीला गती मिळाल्याबद्दल राज्य सरकारचे आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे जिल्हा वासीयांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानतो; असेही डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले.








