नंदुरबार l प्रतिनिधी-
लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अक्कलकुवा पोलीस ठाण्यात नियुक्त असलेल्या पोलीस अंमलदाराला अटक करण्यात आली असून, त्याला नंदुरबार जिल्हा पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे. इम्रान शरीफ खाटीक असे संशयित पोलीस अंमलदाराचे नाव असून, त्याच्याविरुद्ध खातेनिहाय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.
३३ वर्षीय महिलेने २६ नोव्हेंबर रोजी दिलेल्या तक्रारीवरून उपनगर पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी संशयित इम्रान शरीफ खाटीक याला अटक केली आहे. त्याला २८ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
संशयित पोलीस अंमलदार अक्कलकुवा पोलीस ठाण्यात नियुक्तीस असल्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी त्याला शासकीय सेवेतून निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
या गुन्ह्याचा तपास उपनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमोल सातोदकर हे स्वतः करीत आहेत. गुन्ह्याशी संबंधित डिजिटल पुरावे संकलित करून सखोल तपास करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी तपास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
पोलीस दलातील कर्मचाऱ्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाकडे जिल्ह्यात लक्ष लागले आहे.
*अशी उघड झाली घटना
पोलीस अंमलदार इम्रान खाटीक याने जुनी ओळख दाखवून पंधरा ते वीस दिवसांपूर्वी इंस्टाग्राम वरून पीडित महिलेची मैत्री केली. नंतर प्रत्यक्ष भेटीत एकत्र फोटो काढले. ते व्हायरल करण्याची धमकी देत दि. 26 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी सहा वाजे दरम्यान नंदुरबार शहराच्या बाहेरील बाबा रिसॉर्ट जवळ बोलावले. तिथून करजकुपे रोडवरील महिंद्रा पब्लिक स्कूल जवळील मैदानावर नेले. इम्रान अतिप्रसंग करू लागताच तिने आरडाओरड केली. तेव्हा धावून आलेल्या लोकांनी तिला सोडवले व इम्रानला मार देऊन उपनगर पोलीस ठाण्याच्या हवाली केले. नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात पीडित महिलेने फिर्याद दिली त्यावरून लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








