नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यात शिवसेना शिंदे गटाला मोठे बळ मिळाले असून, तालुक्यातील तब्बल २७ गावांतील शेकडो कार्यकर्त्यांनी शनिवारी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. येथे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त आयोजित प्रवेश सोहळ्यात हा पक्षप्रवेश झाला.पालिकेची पाणीपुरवठा योजना अत्यंत चांगल्या दर्जाची करण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी शिवसेनेचे नेते,आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी यावेळी दिले.
नवापूर येथे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन व भव्य प्रवेश सोहळा शनिवारी आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी आ. चंद्रकांत रघुवंशी बोलत होते. पुढे ते म्हणाले,नगरपालिका निवडणुकीच्या काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रितपणे निवडणूक लढविली होती. त्यावेळी जाहीर सभेत नागरिकांना पाणीपुरवठा योजना आणण्याचे आश्वासन देण्यात आले होते.त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाणीपुरवठा योजनेच्या मंजुरीची मागणी करण्यात आली असता अवघ्या पाच मिनिटांत ९५ कोटी रुपयांची योजना मंजूर करण्यात आली, असे आ. रघुवंशी यांनी सांगितले. ही योजना अत्यंत चांगल्या दर्जाची करण्यात येणार असून, योजनेला विरोध करून त्याचे राजकारण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. पालिकेने पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षण केले असून, त्याच दृष्टिकोनातून ही योजना मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना आ. आमश्या पाडवी म्हणाले, तालुक्यातील शिवसैनिकांनी संघटन मजबूत करण्यासाठी गावागावात पक्षाचे काम पोहोचवावे, असे आवाहन केले. विरोधकांकडून कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करत, अशा धमक्यांना शिवसैनिकांनी घाबरू नये. शिवसेनेत लढवय्ये कार्यकर्ते असून, सातत्याने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षात निश्चितच न्याय मिळतो.मागील पंचवार्षिक निवडणुकीत आपला पराभव झाला होता. मात्र पक्षाने विधान परिषदेची संधी देत आपल्याला न्याय दिला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पदाची अपेक्षा न ठेवता सातत्याने पक्षाचे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
*तालुक्यातील २७ गावातील ग्रामस्थांच्या प्रवेश*
निमदर्डा, मेनतलाव, खांडबारा, विसरवाडी, चिंचपाडा, वडसत्रा, वासदि, चिमणीपाडा, पिंपळा, बोरपाडा, खडकी, खैरवे, शेजवे, सोनखांब, दापूर, मोठे कडवान, लहान कडवान, वराडीपाडा, भादवड, अंजने, घोगळपाडा, मौलवीपाडा, तारापूर, डोंगेगाव, चेडापाडा आदी २७ गावांतील असंख्य ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, तालुकाध्यक्ष बकाराम गावित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वकील पाटील, नगरसेवक परवेज खान, बांधकाम सभापती भालचंद्र गावित, के. टी. गावित, माजी जिल्हाप्रमुख शंकर दर्जी, माजी नगरसेवक गणेश वडनेरे, माजी सरपंच रामू गावित, विजय ठाकरे, अशोक गावित आदी उपस्थित होते.











