नंदुरबार l प्रतिनिधी-

८० व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला विद्यालयात अत्यंत मंगलमय, भव्य आणि देशभक्तीने ओतप्रोत वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम” च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षा वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.व्यासपीठावर प्राचार्य नूतनवर्षा वळवी, उपप्राचार्य विजय पवार, पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा पर्यवेक्षिक मीनल वळवी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या विविध सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली.
६ वी ‘ब’ मधील विद्यार्थी नक्ष सुनील पवार याने भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास आणि त्याचे महत्त्व यावर ओघवत्या शैलीत माहिती मांडली.दिशा सोनावणे यांनी जगातील विविध देशांच्या राष्ट्रीय ध्वजांची रंजक माहिती देत, भारतीय तिरंग्याचा आजपर्यंतचा ऐतिहासिक प्रवास सविस्तरपणे उलगडून दाखवला. त्यानंतर प्रसाद दीक्षित यांनीही विद्यार्थ्यांसमोर तिरंग्याचे महत्त्व आणि त्याची विस्तृत माहिती मांडली.
प्रसाद दीक्षित यांच्या समूहाने “हम युवकों का नारा है, भारत हमको प्यारा है” हे स्फूर्तीगीत सादर केले. शारदा पाटील यांनी “तीन रंग झेंड्याचे” हे अत्यंत सुंदर गीत गायले.
माध्यमिक विभागातील शिक्षिकांनी व विद्यार्थिनींनी मिळून “बलसागर भारत होवो” या अजरामर गीताचे सामूहिक गायन केले. यासोबतच “सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा” या गीताचेही गायन करण्यात आले. ‘वंदे मातरम’ १५० व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष नृत्य व नशामुक्त भारताची प्रतिज्ञा घेण्यात आली.
‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताच्या १५० व्या महोत्सवी वर्षानिमित्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी “वंदे मातरम” आणि “ए वतन मेरे वतन” या देशभक्तीपर गीतांवर अत्यंत आकर्षक आणि मंत्रमुग्ध करणारे समूहनृत्य सादर केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मनीष पाडवी यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना ‘नशामुक्त भारत’ घडवण्याची गंभीर व महत्त्वपूर्ण प्रतिज्ञा दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष पाडवी यांनी केले व आभार प्रदर्शन प्रसाद दीक्षित यांनी केले. देशभक्तीचा प्रचंड उत्साह यांसह कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.











