शहादा l प्रतिनिधी
पहिल्यांदा नगरपालिकेच्या निवडणुका होतील की जिल्हा परिषदेच्या. याबाबत संभ्रमावस्था असून, जिल्ह्यात सर्वच नगरपालिकांच्या निवडणुका लढवण्यासाठी शिवसेनेची तयारी आहे.पण,जे आमच्यासोबत सन्मानाने राहतील किंवा आम्हाला बरोबर घेतील त्यांच्याच सोबत युती करू असा मानस शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केला.
शहादा तालुक्यातील वैजाली येथे शिवसेनेचा मेळावा व प्रवेश सोहळा गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. आ.रघुवंशी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ.चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील शहादा तालुक्यात असलेल्या चारही जि.प गटात शिवसेनेचे उमेदवार देण्यात येतील. विरोधकांकडून शिवसेनेला सोबत घेणार नसल्याचे सांगितले जात आहे.त्यामुळे नंदुरबार तालुक्यात सर्वच ठिकाणी जि.प गटात शिवसेनेचे उमेदवार निवडणुका लढवण्यासाठी उभे करू. शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार विजयी करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी नंदुरबार जिल्हा भक्कमपणे उभा असल्याच्या संदेश राज्यभरात देऊ.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, उपजिल्हाप्रमुख डॉ.राजेंद्र पेंढारकर,तालुकाप्रमुख मनलेश जयस्वाल यांनी देखील मनोगत व्यक्त केले. प्रसंगी वैजाली परिसरातील असंख्य ग्रामस्थांनी शिवसेनेचा शिंदे गटात प्रवेश केला. त्यांचे स्वागत संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी व जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांनी पक्षाचा गमछा देऊन केला.प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके, माजी जि.प अध्यक्ष वकील पाटील,माजी सभापती विक्रमसिंह वळवी, माजी नगरसेवक सुपडू खेडकर, रविंद्र जमादार,शहराध्यक्ष जितेंद्र जमदाडे,युवा सेना जिल्हा उपप्रमुख राजरत्न बिरारे,माजी पं.स सदस्य सखुबाई शेमये,युवा सेना शहर प्रमुख सागर चौधरी,रमन नवले,जयसिंग ठाकरे,एकनाथ ठाकरे, लक्ष्मण पवार, वैजालीचे माजी सरपंच पंकज पाटील,श्रीराम पाटील,विनोद पाटील, गणेश पाटील,भीमराव ठाकरे,चंद्रकांत पाटील,सतीश पाटील,रमेश ठाकरे आदी उपस्थित होते.








