नंदुरबार l प्रतिनिधी –
जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. कुठल्याही परिस्थितीत जिल्ह्यातील जिल्हा परिषद व सर्व नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवायचाच या निर्धाराने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी केले.
नुकतेच विजय चौधरी यांचे नंदुरबार येथे आगमन झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, मंडळाध्यक्ष व मंडळाचे सरचिटणीस यांची बैठक भाजपा जिल्हा कार्यालय “विजयपर्व” नंदुरबार कार्यालयात प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
याप्रसंगी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना विजय चौधरी म्हणाले की, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जनतेचा विश्वास असून सर्वसामान्य नागरिक हे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहेत. नंदुरबार जिल्ह्यात देखील भारतीय जनता पार्टीचे सामर्थ्य असून शहादा, तळोदा, नंदुरबार व नवापूर या चारही नगरपालिकेवर तसेच जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचाच झेंडा फडकेल या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांनी मतदारांशी संपर्क अभियान राबवावे, मतदार यादीची समीक्षा करावी, लोकांचा विश्वास संपादन करावा, असे देखील यावेळी त्यांनी सांगितले.
याप्रसंगी निलेश माळी, जिल्हा सरचिटणीस सदानंद रघुवंशी, बळीराम पाडवी कैलास चौधरी ऍड सत्यानंद गावित सह पदाधिकारी उपस्थित होते.