नंदुरबार l प्रतिनिधी-
धनगर आणि बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून आदिवासी आरक्षण लागू करण्यावर शासकीय पातळीवर प्रयत्न चालू आहेत त्यावरून संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी समाजाकडून विरोध उभा राहिला आहे या पार्श्वभूमीवर व्यापक रणनीती ठरवण्यासाठी महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वात तसेच अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आदिवासी समाजाच्या सल्लागार समितीची बैठक मुंबई येथे पार पडली.
या बैठकीत महाराष्ट्रातील सर्व आघाडीच्या आदिवासी संघटनांचे पदाधिकारी तसेच सर्वपक्षीय आजी-माजी आदिवासी आमदार व खासदार उपस्थित होते. आदिवासी आरक्षण अबाधित राखले जावे तसेच धनगर आणि बंजारा समाजाचा आदिवासींमध्ये समावेश करू नये;
या मागणीवर ठाम राहून सरकार दरबारी विधायक पद्धतीने भूमिका मांड ण्याचा तसेच संघटितपणे विरोध करण्याचा या बैठकीत निर्धार करण्यात आला. डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आदिवासी समाजाच्या विकासाच्या आणि प्रगतीच्या दृष्टिकोनातून आपापले मतभेद विसरून संघटित होण्याची गरज असल्याचे प्रमुख मार्गदर्शनात नमूद केले. व्यासपीठावर संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.