डॉ.समिधा नटावदकर यांनी केला भाजपात प्रवेश
नंदुरबार l प्रतिनिधी-
काँग्रेस पक्षाच्या नेत्या डॉ.समिधा नटावदकर यांनी भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला. नंदुरबार येथील सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या नटावदकर परिवारातील सदस्या तथा काँग्रेसच्या नेत्या डॉ.समिधा नटावदकर यांनी भारतीय जनता पार्टीचे महामंत्री विजय चौधरी व जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी प्रवेश केला.
या प्रवेशाने काँग्रेस पक्षाला जबर धक्का बसला असून डॉ.समिधा नटावदकर या उच्चशिक्षित असून गेल्या अनेक वर्षापासून विविध क्षेत्रात त्यांचे कार्य उल्लेखनीय राहिले आहे. पश्चिम खान्देश भिल्ल सेवा शिक्षण मंडळाच्या त्या संचालिका असून नंदुरबार जिल्ह्यात पश्चिम खान्देश भिल्ल सेवा शिक्षण संस्थाचे कार्य प्रचंड आहे. आदिवासी दुर्गम भागामध्ये या संस्थेने शैक्षणिक सामाजिक कार्यात नेहमी आपला प्रभाव ठेवला आहे. डॉ.समिधा नटावदकर यांच्या पक्षप्रवेशाने भारतीय जनता पार्टीत उत्साहाचे वातावरण आहे. याप्रसगी डॉ.सुहास नटावदकर, सुहासिनी नटावदकर, जयदिप नटावदकर, संदिप चौधरी, मंदार चौधरी, डॉ किशोर पाटील उपस्थित होते.