नंदुरबार । प्रतिनिधी-
नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी अद्याप काही गटातील पक्षातील उमेदवार निश्चित झालेले आहेत.तर काही पक्षांनी अद्याप आपले पत्ते खुले केलेले नाहीत.असे असताना नंदुरबार तालुक्यातील कोळदे गटातून माजी मंत्री आ.डॉ.विजयकुमार गावित यांच्या द्वितीय कन्या तथा खा.डॉ.हीना गावित यांच्या लहान भगिनी डॉ.सुप्रिया गावित या कोळदे या जि.प. गटातून उमेदवारी करून ‘राजकीय एन्ट्री’ घेणार आहेत. भाजपातर्फे इच्छुक उमेदवाराच्या आज मुलाखती घेण्यात आल्या. त्यात हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या 11 गटांचा पोटनिवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवसापर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. या निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक असून काहींचे राजकीय पुनर्वसन तर काहींचा राजकीय बळी जाणार आहे. कोळदे ता.नंदुरबार या गटात भाजपाच्या योगिनी अमोल भारती या निवडून आल्या होत्या. मात्र, पोटनिवडणुकीत त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता असून त्यांच्या जागी आ.डॉ.विजयकुमार गावित यांच्या द्वितीय कन्या तथा खा.डॉ. हीना गावित यांच्या भगिनी डॉ.सुप्रिया गावित यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे समजते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून डॉ.सुप्रिया राजकीय एन्ट्री घेणार आहेत.
त्यामुळे योगिनी अमोल भारती यांना डच्चू मिळणार की त्यांचे दुसऱ्या गटातून राजकीय पुनर्वसन होणार? याबाबत देखील चर्चा सुुरु आहे.
असाच प्रकार शहादा तालुक्यातील म्हसावद गटाबाबत आहे.या ठिकाणचे उमेदवार बाबत अनेक चर्चा आहेत.मात्र सगळ्याच पक्षांनी आपली पत्ते झाकून ठेवली आहे.या गटात जिल्ह्यातील एक दिग्गज नेत्यांची पत्नी उमेदवारी करणार असल्याची शक्यता आहे.