नंदुरबार l प्रतिनिधी
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या धडगाव पंचायत समितीच्या नवीन आणि सुसज्ज प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. तालुक्यातील धनाजे खुर्द येथील रोजरीपाडा येथे एका उत्साही आणि मंगलमय वातावरणात नूतन इमारतीचे भूमिपूजन सरपंच विजयाताई वीरसिंग पावरा आणि उपसरपंच सेवंतीबाई चंद्रसिंग पावरा यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या नवीन इमारतीमुळे पंचायत समितीच्या कामकाजाला गती मिळणार असून, परिसरातील नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.
या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी तब्बल ५ कोटी ६३ लाख ४६ हजार रुपयांच्या भरीव निधीला मंजुरी मिळाली आहे. राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, माजी खासदार डॉ. हिना विजयकुमार गावित आणि जिल्हा परिषद माजी सदस्या डॉ. सुप्रिया विजयकुमार गावित यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा निधी उपलब्ध झाला असून, यामुळे धडगाव तालुक्याच्या विकासात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
भूमिपूजन सोहळ्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते सुभाष पावरा, सामाजिक कार्यकर्ते फेंदा पावरा, फत्तेसिंग पावरा, ग्रामपंचायत सदस्य दिलवरसिंग पावरा, धनाजेचे कारभारी रोहिदास पावरा, गुलाबसिंग पावरा, कांतिलाल पावरा, बोखा पावरा, बबलू पावरा,आकाश पावरा आणि अंधाऱ्या पावरा, चंद्रसिंग पावरा यांच्यासह बोरवण, खरवड आणि धनाजे गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली.
यावेळी बोलताना सरपंच विजयाताई पावरा यांनी सांगितले की, आजचा दिवस धडगाव तालुक्यासाठी अत्यंत ऐतिहासिक आहे. नवीन आणि सुसज्ज प्रशासकीय इमारतीमुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावेल आणि ते अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतील. याचा थेट फायदा तालुक्यातील जनतेला मिळेल. या प्रकल्पासाठी निधी मंजूर केल्याबद्दल आम्ही डॉ. विजयकुमार गावित साहेब आणि डॉ. हिना गावित यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
या नूतन इमारतीमध्ये सर्व आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असून, यामुळे पंचायत समितीच्या विविध विभागांचे कामकाज एकाच छताखाली, अधिक सुनियोजित पद्धतीने चालण्यास मदत होणार आहे. या नवीन विकासामुळे धडगाव तालुका विकासाच्या मार्गावर एक मोठे पाऊल टाकत आहे, अशा भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.