नंदुरबार l प्रतिनिधी-
दुसऱ्याच्या शेतात मजुरीने कोळपणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला विद्युत तारांचे स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना. शहादा तालुक्यातील वैजाली येथे घडली. शेतकऱ्याच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
शहादा तालुक्यातील वैजाली येथे राहणारे मधुकर राजाराम पाटील ( वय ७०) हे पत्नी मुलगा-सून यांच्या समवेत शेती काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. २० जुलै रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास वैजाली- काथर्दा रस्त्यावर असलेल्या निर्मलाबाई दिनकर पाटील यांच्या मालकीच्या शेतात मक्याला कोळपणी करण्यासाठी
गेले होते. त्यानंतर सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास मधुकर पाटील यांचा मुलगा जितेंद्र पाटील घरी असताना त्याचा मित्र दुचाकी घेऊन आला. व त्याने सांगितले की, तुमचे वडील मधुकर पाटील हे शेतात बेशुद्ध अवस्थेत आहेत. त्यांच्या ॲल्युमिनियमची तार गळ्यात अडकून पडली आहे. त्यानंतर मित्रासमवेत जितेंद्र पाटील यांनी शेतात जावुन पाहिले असता शेतात इलेक्ट्रिकचे तीनही तार पडलेल्या दिसले त्यात मधुकर पाटील त्या विद्युत पोलवरील इलेक्ट्रिक तारच्या खाली इलेक्ट्रिक शॉक लागून मरण पावलेल्या स्थित आढळून आले.
जितेंद्र पाटील यांनी लगेच पोलिसांशी संपर्क साधला. मित्रपरिवार तसेच गावकऱ्यांनी मधुकर पाटील यांच्या मृतदेह प्रकाश येथे आरोग्य केंद्रात घेऊन गेले. त्या ठिकाणी मधुकर पाटील यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी जितेंद्र मधुकर पाटील यांच्या खबरीवरून शहादा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हलाखीची परिस्थिती असलेल्या पाटील कुटुंबातील होतकरू शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.