नंदुरबार l प्रतिनिधी-
जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त आज “जय शिवाजी जय भारत” पदयात्रेचा भव्य प्रारंभ माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित व जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजनाने झाला. कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने झाली.
“जय शिवाजी जय भारत” यात्रेला हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यावेळी छत्रपती शिवाजी महारांचे शिवराय औक्षण” आणि शिवरायांची स्वराज्य शपथ घेण्यात आली. यात्रेत लेझीम पथक, स्केटिंग पथक, ढोल पथक आदींचा समावेश होता. तसेच जिजामाता, शिवाजी महाराज, भारतमाता, मावळे व विद्यार्थी यांच्या जीवंत देखाव्यांनी मिरवणुकीला विशेष आकर्षण प्राप्त झाले.
ही मिरवणूक डॉ. काणे गर्ल्स हायस्कूलपासून सुरू होऊन अंधारे चौक, नगरपालिका, नेहरू पुतळा, गांधी पुतळा, हाटदरवाजा, शास्त्री मार्केट मार्गे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे विसर्जित झाली.
यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त एस, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपजिल्हाधिकारी (महसूल प्रशासन) गोविंदा दाणेज, तहसिलदार मिलींद कुलथे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना वळवी, उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण, काणे गर्ल्स हायस्कुलच्या मुख्याध्यापिका सीमा मोडक इतर मान्यवर शिक्षक-शिक्षिका विद्यार्थी यांच्यासह या भव्य मिरवणुकीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.