नंदुरबार l प्रतिनिधी
राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आ. डॉ. विजयकुमार गावित हे नेहमीच जिल्ह्यातील व तालुक्यातील प्रत्येक गावाला प्रत्यक्ष भेट देऊन समस्या जाणून घेण्यात व त्यांचे निराकरण करण्यात अग्रेसर राहिले आहेत. त्याच धर्तीवर आता नंदुरबार शहरातील प्रत्येक कॉलनीत प्रत्येक वसाहतीत भेट देऊन लोकांशी संवाद साधण्याचा व समस्या जाणून घेण्याचा नवीन उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे.
या अंतर्गत नंदुरबार शहरातील जय हिंद कॉलनी परिसरात त्यांनी भेट दिली आणि तेथील रहिवासी नागरिकांशी संवाद साधला. त्याप्रसंगी ड्रेनेज, पाणी, रस्ते याच्या समस्या नागरिकांनी मांडल्या. गटार व्यवस्था नीट नसल्याचे, रस्त्यांचे काम निकृष्ट असल्याचे म्हणणे मांडले. तर काही नागरिकांनी ओपन स्पेस मुलांसाठी उपयोगात येत नसल्याचे लक्षात आणून दिले त्याचबरोबर जड वाहतुकीमुळे होणारा त्रास आणि तत्सम अडचणी मांडल्या. यावर डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले की, ओपन स्पेस विकसित करण्यासारख्या अनेक कामांना या पाच वर्षात प्राधान्य देऊन पूर्ण करण्याचे धोरण आहे.
नागरिकांनी आमच्याकडे म्हणणे मांडावे आणि त्यांच्या सूचनेनुसार त्यांची सोय सुविधा करून देऊ स्थानिक विद्यार्थ्यांना उपयोगात येणारी आधुनिक अभ्यासिका ओपन स्पेस मध्ये उभारून देऊ. गावात येणाऱ्या वाहनांची समस्या सोडवण्यासाठी पाच ते आठ किलोमीटर लांबीचा रिंग रोड बनवला जाणार आहे.
त्यासाठी मी प्रयत्नशील असून लवकरात लवकर तुम्हाला उपलब्ध करून देईल त्यामुळे गावात येणाऱ्या वाहनांची समस्या सुटेल. सोनगीर पासून विसरवाडी पर्यंत चौपदरी रस्ता बनवला जाणार आहे त्यामुळे तुमच्या परिसराला देखील त्याचा लाभ होईल तळोदा पर्यंतच्या रस्त्याचा प्रश्न सुटलेला दिसेल, असे डॉ. विजयकुमार गावित म्हणाले. यावेळी भाजपाचे पंकज पाठक, निलेश वळवी, संदीप बोरसे, माजी नगरसेवक, स्थानिक मान्यवर ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.