नंदुरबार l प्रतिनिधी-
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12 वी) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (10 वी) परीक्षांच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार रोखण्यासाठी आणि परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी गोविंदा दाणेज यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये मनाई आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार, परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात परीक्षेशी संबंधित नसलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या प्रवेशास प्रतिबंध असेल. तसेच, परीक्षा केंद्राच्या 500 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर, सायबर कॅफे, सार्वजनिक टेलिफोन, एस.टी.डी., आय.एस.डी., फॅक्स केंद्र आणि ध्वनीक्षेपके बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हे आदेश 15 फेब्रुवारी 2025 ते 04 एप्रिल, 2025 या कालावधीसाठी लागू राहतील. 12 वी आणि 10 वीच्या परीक्षांच्या दिवशी सकाळी 8:00 ते सायंकाळी 6:00 पर्यंत हे निर्बंध लागू असतील.
परीक्षा नेमणूक केलेले कर्मचारी, अधिकारी, पोलीस व परिक्षार्थी यांचे व्यतिरिक्त प्रतिबंधीत क्षेत्रात कोणासही प्रवेश करता येणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.