नंदुरबार l प्रतिनिधी-
जिल्ह्यातील सर्व अन्न व्यवसायिकांनी अन्न परवाना किंवा नोंदणी घेऊनच व्यवसाय करावा, अन्यथा त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त सं. शि. देवरे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळवले आहे.
अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 आणि नियम व नियमन 2011 नुसार, कोणत्याही प्रकारचा अन्न व्यवसाय परवाना किंवा नोंदणीशिवाय करणे बेकायदेशीर आहे. बिनापरवाना व्यवसाय केल्यास 10 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो. तसेच, अन्न व औषध प्रशासनामार्फत जिल्ह्यात लवकरच धडक तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. अन्न व्यवसायिकांकडे परवाना असल्यास त्याचे वेळेत ऑनलाईन नूतनीकरण करणे आवश्यक आहे. अन्यथा, मुदत संपल्यानंतर परवाना रद्द होईल आणि बेकायदेशीर व्यवसाय गृहित धरला जाईल. यामुळे संबंधित व्यावसायिकाला 6 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. अन्न परवाना व नोंदणीसाठी ‘https://foscos.fssai.gov.in’ हे अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध आहे.
➤ वार्षिक उलाढाल 12 लाख रुपयांपर्यंत असलेल्या व्यावसायिकांनी फक्त नोंदणी (Registration) करावी.
➤ वार्षिक उलाढाल 12 लाखांहून अधिक असलेल्या आस्थापनांनी अन्न परवाना (License) घेणे बंधनकारक आहे.
सर्व अन्न व्यवसायिकांनी संभाव्य कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी त्वरित परवाना अथवा नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन, सहायक आयुक्त सं. शि. देवरे यांनी केले आहे.