नंदुरबार l प्रतिनिधी-
खासदार असतांना दुर्गम-अतिदुर्गम भागाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली आहेत. केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर योजना आणून येथील आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला आहे.यामुळे विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी जनता संधी देईल, असा विश्वास डॉ.हिना गावित यांनी व्यक्त केला.
अक्कलकुवा-धडगाव विधानसभा मतदारसंघात घाटली गटात प्रचार दौऱ्यादरम्यान घेण्यात आलेल्या कॉर्नर सभांमध्ये मतदारांशी डॉग़ावित यांनी संवाद साधला.अक्कलकुवा-धडगाव विधानसभा मतदारसंघातील घाटली गटात प्रचार दौऱ्यादरम्यान घाटली, वलवाल, मक्ताझिरा, गोरांबा, काकरदा, खामला, निगदी, मोडलगाव येथे प्रचार रॅली काढण्यात आली होती.यावेळी विविध गावांमध्ये घेण्यात आलेल्या कॉर्नर सभांमध्ये बोलतांना डॉ.हिना गावित म्हणाल्या, स्थानिक लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने पाहिजे त्या प्रमाणात या भागाचा विकास होवू शकला नाही.सन २०१४ ते २०२४ पर्यंत दहा वर्षाच्या काळात आपण संधी दिल्याने खासदार झाली होती.
या कालावधीत शक्य तितक्या जास्तीत जास्त शासनाच्या योजना या भागात आणून त्याचा शेवटच्या माणसापर्यंत लाभ देण्याचा प्रयत्न केला. रस्ते कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करुन घेत रस्ते कामे करण्याचा प्रयत्न करत गांव पाडे जोडण्याचा प्रयत्न केला आहे.
दुर्गम अतिदुर्गम भाग असल्याने येथे नेहमीच नेटवर्कची समस्या होती.यामुळे बहुसंख्य ठिकाणी टॉवर मंजूर करुन नेटवर्कची सुविधा केल्याने संदेशवहन सोयीचे झाले आहे. तसेच बँकांची संख्या कमी असल्याने अनेकदा येथील सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता.यामुळे बँकांच्या शाखा मंजूर करुन घेण्यासाठी पाठपुरावा केला.
उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून हजारो महिला भगिनींना लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे.असे असले तरी स्थानिक लोकप्रतिनिधींनी ३५ वर्षांपर्यंत याकडे दुर्लक्ष केल्याने पाहिजे त्या प्रमाणात विकास होवू शकला नाही.यामुळे विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी संधी द्यावी, असे आवाहन डॉ.हिना गावितांनी केले.यावेळी मतदारांशी संवाद साधत त्यांनी समस्या जाणून घेतल्या व त्या लवकरच सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे डॉ.ग़ावित म्हणाल्या.