नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील वाडीबार गाव शिवारात
दोन महिन्याच्या बाळाला विहीरीच्या पाण्यात टाकून जीवेठार मारल्याची घटना घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध मोलगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्कलकुवा तालुक्यातील बिजरीपाटी येथील फुलवंती प्रताप वसावे या महिलेला तिचा पती प्रताप खेमा वसावे, सविता माकत्या वळवी या दोघांनी दोन महिन्याच्या मुलाला जीवेठार मारण्याबाबत अपप्रेरणा दिली. त्यामुळे फुलवंती प्रताप वसावे हिने श्रावण प्रताप वसावे (वय २ वर्ष) या बाळाला वाडीबार गावाच्या शिवारातील शेतातील विहीरीतील पाण्यात टाकले. त्यामुळे सदर बाळाचा मृत्यू झाला आहे.
याबाबत हेकॉ. अरुण नानाभाऊ सैंदाणे यांनी मोलगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फुलवंती प्रताप वसावे, प्रताप खेमा वसावे (रा. बिजरीपाटी), सविता माकत्या वळवी (रा.वाडीबार) या तिघांविरुद्ध भा.न्या.सं.चे कलम १०३ (१), ४६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी अप्पर पोलिस अधिक्षक, अक्कलकुव्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी, मोलगीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास पावरा, पोलिस उपनिरीक्षक सागर गाडीलोहार यांनी भेट दिली आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास पावरा करीत असून संशयीत तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.