नंदुरबार l प्रतिनिधी
राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व लेक लाडकी या योजना सुरु करण्यात आल्या असून या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी जवळच्या पोस्ट कार्यालयात बचत खाते उघडावे असे आवाहन धुळे विभागाचे प्रवर अधिक्षक जी हरि प्रसाद यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
या दोन्ही योजनांचा लाभ घेण्याची कार्यपध्दती शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येत असून आर्थिक लाभ डीबीटी पध्दतीने देण्यात येणार आहे. यासाठी बचत खाते उघडणे आवश्यक असून ते जवळच्या कोणत्याही पोस्ट कार्यालयात उघडता येईल.
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेअंतर्ग प्रत्येक पात्र महिलेस तिच्या स्वत:च्या बचत खात्यात थेट रुपये 1 हजार 500 इतकी रक्कम जमा करण्यात येणार आहे. यासाठी पोस्ट कार्यालयात बचत खाते उघडण्यासाठी पात्र महिलेचे आधार कार्ड, पॅन कार्ड, व 03 फोटो इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.
तसेच “लेक लाडकी” या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना विविध टप्प्यावर देण्यात येणारा लाभ थेट बचत खात्यावर जमा करण्यात येईल. यासाठी पोस्ट कार्यालयात बचत खाते उघडण्यासाठी मुलीचे जन्म प्रमाणपत्र, मुलीचे आधार कार्ड, आईचे आधारकार्ड व पॅन कार्ड, मुलीचे व आईचे संयुक्त 03 फोटो व आवश्यक कागदपत्रे लागतील.
नंदुरबार जिल्ह्यातील पात्र महिला लाभार्थ्यांनी जिल्ह्यातील सर्व डाकघरे आणि शाखा डाकघरे यामध्ये पोस्ट ऑफिस बचत खाते अथवा इंडिया पोस्ट पेमेंट बँक खाते उघडून घ्यावे, भारतीय डाक विभाग हे जनतेला सेवा देण्यासाठी सदैव अग्रेसर राहील, असेही प्रवर अधिक्षक जी हरि प्रसाद यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.