नंदुरबार l प्रतिनिधी
कोरोना कालावधीत मुले ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईल, टॅब, लॅपटॉप या गॅझेटमध्ये अडकलेली आहेत. त्यामुळे मुलांचे मैदानी खेळ तसेच सर्व कलाप्रकारांकडे दुर्लक्ष झाले आहे. तसेच मातृभाषा मराठीत संवाद साधण्याचे कौशल्य देखील इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे कमी झालेले आहे. या सर्व मुलांना त्यांच्या मूळ बालपणाकडे, आजोबा आजींच्या गोष्टींकडे वळवून त्यांच्यात संस्कार रुजविण्याचे काम बालरंगभूमी परिषद करणार आहे. आगामी काळात विविध उपक्रमांच्या माध्यमातून बालकांना कलाप्रकारांसह, पारंपारिक वाद्ये यांची ओळख करवून देण्यात येणार आहे. तसेच राज्यात बालरंगभूमी संमेलन घेण्यात येणार असल्याचे बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीच्या अध्यक्षा अभिनेत्री नीलम शिर्के-सामंत यांनी सांगितले.
बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर नीलम शिर्के-सामंत या राज्याचा दौरा करून राज्यातील २५ शाखांना भेट देवून, त्या त्या ठिकाणच्या बालकलावंतांशी, पालकांशी व बालरंगभूमी परिषदेच्या शाखा पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेत आहेत. शनिवारी बालरंगभूमी परिषदेच्या नंदुरबार शाखेच्या भेटीप्रसंगी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना त्या पुढे म्हणाल्या की, बालरंगभूमी परिषदेची स्थापना पाच वर्षांपूर्वी करण्यात आली. मात्र त्यानंतर लगेचच आलेल्या कोविड कालावधीत लॉकडाऊनमुळे प्रत्यक्षात कार्य झाले नाही.
मुलांसोबत ऑनलाईन संपर्क होता. मात्र आता नव्याने कार्य सुरु करुन बालरंगभूमी परिषदेच्या कार्याला गती देण्याचे ठरविण्यात आले आहे. आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातील 13 शाखांना मी भेट दिली आहे. परिषदेच्या शाखा कार्यान्वित करण्यासह त्या अधिकाधिक कार्य कशा करतील यासाठी आता प्रयत्न करणार आहे. बालकलावंत घडविण्यासोबतच बालप्रेक्षक घडविण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा सुरु आहे. बालरंगभूमी परिषदेच्या शाखा विविध कार्यशाळा व महोत्सव घेण्यासोबतच स्पेशल चाईल्डसाठीही कार्य करणार आहेत. त्यांच्या कलागुणांना सादर करण्याची संधी त्यांना देण्यात येणार आहे.
मुलांच्या हातातून मोबाईल सुटून त्यांना कलाप्रकारांकडे वळविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. बालसंस्कार शिबिरात जावून मुलांवर संस्कार घडवावे लागतात हे आपले दुर्दैव आहे. कलेच्या माध्यमातून मुलांचा केवळ बौध्दिक विकासच नाही तर त्यांना चारचौघात बोलण्याचा समाधीटपणा, प्रसंगावधान, स्मरणशक्ती वाढून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य बालरंगभूमी परिषद करणार आहे. बालकांसोबत पालकांचेही समुपदेशन करण्यात येणार असून, आगामी काळात बालनाट्य स्पर्धा, लोककला महोत्सव शाखांद्वारे घेतला जाणार आहे.
या बालनाट्य स्पर्धात रंगमंचावर व रंगमंचामागेदेखील बालकलावंतच भूमिका निभावणार आहेत. या स्पर्धांच्या माध्यमातून बालकलावंत व बालप्रेक्षक घडल्यानंतर, राज्यस्तरावर महास्पर्धा व महोत्सवाच्या माध्यमातून या बालकलावंतांना राज्यपातळीवर रंगमंच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे बालकांसोबत पालकांनीही बालरंगभूमी परिषदेचे सभासद होण्याचे आवाहन अभिनेत्री नीलम शिर्के-सामंत यांनी केले.
बालरंगभूमी संमेलनाचे दरवर्षी आयोजन
१०० व्या अंतिम अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे रत्नागिरी येथे आयोजन होणार आहे. हे नाट्यसंमेलन सहा दिवसांचे असून, यातील तीन दिवस हे बालनाट्याला देण्यात आले आहेत. तसेच दरवर्षी बालरंगभूमी संमेलनाचे आयोजन करण्यात येणार असून, वर्षभरात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शाखेला या संमेलन आयोजनाचा मान मिळणार आहे.
यावेळी पत्रकार परिषदेला मध्यवर्तीच्या अध्यक्षा नीलम शिर्के-सामंत, प्रमुख कार्यवाह सतीश लोटके, कोषाध्यक्ष दिपक रेगे, सहकार्यवाह आसेफ अन्सारी, दिपाली शेळके, नंदुरबार शाखेचे अध्यक्ष राजेश जाधव, उपाध्यक्ष मनोज सोनार, प्रमुख कार्यवाह नागसेन पेंढारकर, कार्यकारिणी सदस्य हरीश हराळे, राहुल खेडकर, गिरीश वसावे, अलका जोंधळे, काशिनाथ सूर्यवंशी यांच्यासह मध्यवर्ती शाखेचे तसेच राज्यातील शाखांचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य, राज्यातील शाखांचे पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या प्रसंगी त्यांनी नंदुरबार शाखेची आढावा बैठक देखील घेतली.
त्या बैठकीत त्यांनी बालरंगभूमी परिषदेच्या सभासदांना आगामी उपक्रमांची माहिती देऊन नंदुरबार जिल्ह्यातील जास्तीत जास्त कलावंतांना बालरंगभूमिशी जोडण्याचे आवाहन केले. तसेच बालक-प्रेक्षक योजनेतर्गत जिल्ह्यातील सर्वच शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना या योजनेत जोडून सुजाण प्रेक्षक व त्यातून चांगले कलावंत उदयास येतील असा विश्वास व्यक्त केला. या बैठकीचे प्रास्ताविक शाखेचे प्रमुख कार्यवाह नागसेन पेंढारकर यांनी केले. सूत्रसंचालन विष्णू जोंधळे तर आभार अध्यक्ष राजेश जाधव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषद नंदुरबार जिल्हा शाखेच्या सभासदांनी परिश्रम घेतले.