शहादा l प्रतिनिधी
येथील पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळ संचलित के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत कृषी पदविका अभ्यासक्रमासाठी शनिवार दि.1 जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयात विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.यांत कृषी अधिष्ठान पदविका, कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदविका, कृषी उद्यानविद्या पदविका,
कृषी पत्रकारिता पदविका या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया शनिवार दि.1 जून पासून सुरू करण्यात आली आहे. यासाठी किमान शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण आहे. याशिवाय दहावीनंतर अन्य शिक्षण घेत असतांना कृषी पदविका करण्याची सुवर्णसंधी परिसरातील इच्छुक विद्यार्थ्यांना प्राप्त झाली आहे. दहावी उत्तीर्ण झालेल्या व अकरावी कला, विज्ञान,वाणिज्यला प्रवेश घेतलेले तसेच आयटीआय, तंत्रनिकेतनला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळू शकणार आहे.
के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालय शहादांस अ वर्ग प्राप्त झालेला असून येथील अभ्यास केंद्रास महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांची मान्यता प्राप्त आहे.पदविकाधारकांस बी-बियाणे, खत, कीटकनाशक कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी आहे. याशिवाय कृषी सेवा केंद्र परवाना घेऊन स्वतंत्र व्यवसायाचीही संधी कृषी पदविका धारकाला मिळू शकते. इच्छुकांनी कृषी महाविद्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. पी.एल.पटेल यांनी केले आहे.