नंदुरबार l प्रतिनिधी
गेल्या बारा वर्षाचे सातत्य हेच हस्ती-जिभाऊ करंडक या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे यश आहे कोणतीही कला जिवंत ठेवण्यासाठी सातत्य महत्त्वाचे असते असे प्रतिपादन दि.हस्ती को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड दोंडाईचाचे चेअरमन कैलास जैन यांनी केले. ते हस्ती जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी बोलत होते.
गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ शिंदे आयोजित राज्य पुरस्कृत शिक्षक जयदेव लिंबा पेंढारकर तथा जिभाऊ यांच्या स्मरणार्थ दि.हस्ती को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड प्रायोजित हस्ती-जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा दिनांक रविवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह नंदुरबार येथे जल्लोषात समारोप झाला या पारितोषिक वितरण प्रसंगी महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम सिने, नाट्यअभिनेता कुणाल मेश्राम, ‘दिपस्तंभ’ या पुरस्काराचे मानकरी आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावित, ज्येष्ठ साहित्यिक दिनानाथ मनोहर, सिने दिग्दर्शक शाम रंजनकर, ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यिक रमाकांत पाटील, कृषी अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी,
सिने निर्माता तथा सुप्रसिद्ध मूर्तिकार मनोज वसईकर, स्टेट बँक ऑफ इंडिया हाऊसिंग लोन कौन्सिलर मनीष बिरारे, बालरोगतज्ञ डॉ.समिधा नटावदकर-पाने, मुख्याध्यापक बी.एस.पवार, दंतचिकित्सक डॉ.प्रियंका संजय चौधरी, डॉ.जितेंद्र पानपाटील, प्रदीप कांबळे आदी उपस्थित होते. या दोन दिवसात सादर झालेल्या एकूण दहा एकांकिकाच्या माध्यमातून १२५ नाट्यकलावंतांनी सहभाग घेतला होता. दिनांक ११ फेब्रुवारी रविवार रोजी दिवसभरातून सहा एकांकिकेचे सादरीकरण झाले.
नाट्य रसिकांची लक्षणीय उपस्थिती होती. प्रत्येक एकांकिका संपल्यानंतर स्पर्धक, परीक्षक व प्रेक्षक असा संवाद घडवून आणत आयोजकांनी या वर्षी विशेष उपक्रम राबविला. त्यामुळे स्पर्धकांसोबतच प्रेक्षकांना नाटकातील विविध तंत्रांची ओळख होत होती.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाप्रसंगी जिभाऊ करंडक आयोजन समितीतर्फे दिला जाणारा मानाचा ‘दीपस्तंभ’ हा पुरस्कार आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी नटावद ता.जि.नंदुरबार, नंदुरबार जिल्हा कला अकादमी व जिल्हा क्रीडा अकादमीचे अध्यक्ष, नंदुरबार जिल्हा साहित्य अकादमी चे स्वागताध्यक्ष राजेंद्रकुमार कृष्णराव गावित यांना जेष्ठ साहित्यिक दीनानाथ मनोहर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. या दीपस्तंभ पुरस्काराच्या उत्तर देताना राजेंद्र कुमार गावित म्हणाले की मला अनेक मिळालेल्या पुरस्कारांपेक्षा आपल्या मातीतला आपल्या जिल्ह्यातला पुरस्कार मिळाला हा माझ्यासाठी मानाचा आहे. जिभाऊ करंडक च्या माध्यमातून गेल्या बारा वर्षांपासून सुरू असलेली नाट्यचळवळ म्हणजे एक महायज्ञ आहे. या हस्ती-जिभाऊ करंडक च्या मंचावरून पुरस्कार मिळत असल्याचा मला अभिमान आहे.
परीक्षक प्रदीप कांबळे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. या बक्षीस वितरण कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम सिने तथा नाट्य अभिनेता हेमंत पाटील यांनी देखील उपस्थिती लावली. यादरम्यान आयोजक तथा नाट्यकर्मी नागसेन पेंढारकर यांनी हेमंत पाटील यांच्याशी संवाद साधला. त्या मुलाखतीदरम्यान हेमंत पाटील यांच्या अभिनयाच्या प्रवासाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच नवकलावंतांसाठीचे मार्गदर्शन देखील यात करण्यात आले. याप्रसंगी हेमंत पाटील यांना देखील जिभाऊ करंडक आयोजन समितीतर्फे ‘खान्देश रत्न’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या दोन दिवशीय एकांकिका स्पर्धेचे परीक्षण केंद्रीय संचार ब्युरो, सूचना व प्रसारण मंत्रालयाचे प्रबंधक डॉ.जितेंद्र पानपाटील,सुप्रसिद्ध सिने तथा नाट्य अभिनेते कुणाल मेश्राम, सिने तथा नाट्य अभिनेता प्रदीप कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागसेन पेंढारकर यांनी केले.
सूत्रसंचालन राजेश जाधव व क्षमा वासे-वसईकर यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आयोजक नागसेन पेंढारकर, मनोज सोनार, राजेश जाधव, आशिष खैरनार यांच्यासह तुषार सांगोरे, क्षमा वसईकर, कुणाल वसईकर, जितेंद्र खवळे, काशिनाथ सूर्यवंशी, जितेंद्र पेंढारकर, चिदानंद तांबोळी, पुरुषोत्तम विसपुते, किरण दाभाडे, हर्षल महिरे, प्रफुल्ल महिरे, हेमंत पेंढारकर, दर्शन सोनार, पार्थ जाधव, संदीप बांगड, गौरव पाटील, तनिष्का पेंढारकर आदींनी परिश्रम घेतले.
हस्ती-जिभाऊ करंडक
राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा,नंदुरबार
अंतिम निकाल – प्रथम – संपर्क क्रमांक (कलासक्त, अंधेरी मुंबई), द्वितीय – सेकंड हॅन्ड (महात्मा गांधी शिक्षण मंडळ कला विज्ञान महाविद्यालय चोपडा), इंटरोगेशन (क्रिएटिव्ह कार्टी मुंबई), लक्षवेधी एकांकिका – रंसुरी (विजिकिषा थिएटर नाशिक), विनोदी एकांकिका – लॉटरी (लोकमंगल कलाविष्कार सहकारी संस्था नाशिक विभाग, शाखा – धुळे), उत्कृष्ट अभिनय पुरुष प्रथम – गौरव पाटील (संपर्क क्रमांक), द्वितीय – कुणाल शिंदे (कात), तृतीय – रोहित हराळे (सुरवंटाचं डिफ्रॅगमेंटेशन), उत्कृष्ट अभिनेत्री स्त्री प्रथम – राजश्री जमदाडे (इंटरोगेशन) व रचना अहिरराव (सेकंड हॅन्ड), द्वितीय – डॉ.यशश्री कंटक (संपर्क क्रमांक) व ज्योति मंगळे (लॉटरी), तृतीय – वृषाली पाटील(भभूत्या) व गीता शिंपी (रंसुरी), उत्कृष्ट दिग्दर्शन प्रथम – मकरंद चौधरी (सेकंड हॅन्ड), द्वितीय – योगेश कदम (इंटरोगेशन), तृतीय – यशश्री व अर्चिता (संपर्क क्रमांक), सर्वोत्कृष्ट लेखन – अभिजित शरद कबाडे (कात), सर्वोत्कृष्ट संगीत – समिधा रोके (संपर्क क्रमांक), सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना-सिद्धेश नांदलस्कर-निलेश माळी (सेकंड हॅन्ड), सर्वोत्कृष्ट नेपथ्य – पवन इंदरेकर (चांदणी)