नंदुरबार l प्रतिनिधी-
हप्त्याने घेतलेल्या प्रत्येकी सात लाख रुपये किंमतीच्या चार प्लॉटांची रक्कम पुर्णपणे देवूनही प्लॉटची खरेदी न देता स्मित कन्स्ट्रक्शनचे मालक देविदास खंडू नेरकर, सुनिता देवीदास नेरकर व मॅनेजर राहूल राजधर निकम यांनी चार जणांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी नंदुरबार शहर व उपनगर पोलिस ठाण्यात फसवणूक झाल्याचा तक्रार अर्ज देवून पोलिसांनी सदर तक्रारीवरुन फसवणूकीचा गुन्हा दाखल केलेला नसून अन्याय होत आहे. म्हणुन न्याय मिळण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांची भेट घेण्यात येईल. त्यानंतरही न्याय न मिळाल्यास उपोषण करण्यात येईल, अशी माहिती रविंद्र प्रकाश ढंढारे, युवराज जयसिंग राजपूत यांनी दिली आहे.
नंदुरबार येथे दि.14 जानेवारी 2024 रोजी हॉटेल डी.एस.के.च्या सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. याप्रसंगी रविंद्र प्रकाश ढंढोरे, युवराज जयसिंग राजपूत आदी उपस्थित होते. यावेळी रविंद्र ढंढारे व युवराज राजपूत यांनी सांगितले की, नंदुरबार शहरातील स्मित कन्स्ट्रक्शनचे मालक देविदास खंडू नेरकर, सुनिता देवीदास नेरकर व मॅनेजर राहूल राजधर निकम यांनी सन 2016 मध्ये सर्व्हे क्रमांक 217/2/1 व 217/2/2 या ठिकाणी हप्त्याने प्लॉट विक्री करीत असल्याचे सांगून प्लॉट दाखविले.
त्याठिकाणी रविंद्र प्रकाश ढंढोरे, शितल तुकाराम वळवी, मनिषा तुकाराम वळवी, युवराज जयसिंग राजपूत अशा चार जणांच्या नावाने हप्त्याने प्लॉट घेतला. या प्लॉटांच्या हप्त्याची रक्कम घेवूनही सन 2022 पर्यंत स्मित कन्स्ट्रक्शनचे मालक देविदास खंडू नेरकर यांनी सदर प्लॉटांची खरेदी दिली नाही. तसेच वर्षभरापासून प्लॉटांची खरेदी देण्यास वारंवार टाळाटाळ केली. प्लॉट किंवा पैसे मिळण्याची मागणी केली असता देविदास खंडू नेरकर याने त्याबदल्यात नोव्हेंबर 2023 मध्ये रक्कम परत करण्याचा धनादेश दिला. परंतु नेरकर याने आरबीआयने बंद केलेले जुने धनादेश दिल्याची बाब बँकेत जमा केल्यावर लक्षात आले.
त्यामुळे हप्तेची रक्कम अदा करुनही प्लॉट देण्यात आला नसून रक्कम परत मिळालेली नाही. यामुळे स्मित कन्स्ट्रक्शनचे मालक देविदास खंडू नेरकर, सुनिता देवीदास नेरकर व मॅनेजर राहूल राजधर निकम यांच्याकडून आमची फसवणूक झाली आहे. यास्तव दि.6 व 8 डिसेंबर 2023 रोजी नंदुरबार शहर व उपनगर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली. परंतु त्यावरुन कुठलाही गुन्हा नंदुरबार शहर व उपनगर पोलिसांनी दाखल केला नाही.
त्यामुळे प्लॉट खरेदीत फसवणूक झालेल्या चारही व्यक्तींवर अन्याय होत आहे. यासंदर्भात न्याय मिळण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे दाद मागण्यात येईल. त्यानंतरही आम्हाला न्याय न मिळाल्यास उपोषण करण्यात येईल, असे रविंद्र प्रकाश ढंढारे, युवराज जयसिंग राजपूत यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले.








