नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथे नादुरुस्त बस आगारातील वर्कशॉपमधून दुरुस्ती वर्कशॉपला घेऊन जात असतांना बसला केलेले टोचन चढावावर तुटले अन् बस अनियंत्रित होऊन माघारी येत असतांना महाराणा प्रतापांच्या पुतळ्याजवळील कठड्यावर धडकली. यामुळे बस थांबल्याने अनर्थ टळला. मात्र कठड्याचे नुकसान झाले आहे.
सध्या एस.टी. महामंडळाच्या बसेस मोठ्या प्रमाणावर भंगार झाल्याचे चित्र दिसून येत आहे. बसेसला ओढून आणण्यासाठी लागणाऱ्या क्रेन एस.टी.कडे नाहीत. यामुळे विशेष टोचन करुन बसेस आणल्या जातात. परिणामी अपघाताची शक्यता वाढते. असाच प्रकार काल सकाळी नंदुरबार शहरात घडला. नंदुरबार आगारात उभी असलेली बस (क्र.एम.एच. २० बीएल १५४६) या नादुरुस्त बसला दुरुस्ती वर्कशॉपला घेऊन जाण्यासाठी मालवाहू बस (क्र.एम.एच.२० बीएल ०११९) लोखंडी टोचन अडकवून घेऊन जात होते.
यावेळी महाराणा प्रतापांच्या पुतळ्याजवळून जात असतांना चढावावर अचानक बसचे टोचन तुटले अन् नादुरुस्त असलेली बस अनियंत्रित झाली. सदरची बस उतारावरुन माघारी येत असतांना घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी एकच आरडाओरड केली. धावाधाव होत असल्याचे दिसून आले. मात्र सुदैवाने सदरची बस कठड्यावर धडकल्याने थांबली अन् अनर्थ टळला. जर कठडे नसते तर? काय घडले असते? अशा चर्चा घटनास्थळी रंगू लागल्या होत्या.
बस थांबल्यानंतर घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी सुटकेचा सुस्कारा सोडला. दरम्यान, याप्रकरणी बस चालक अनिल जगन्नाथ मासुळ यांच्या खबरीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात मोटार अपघाताची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोना.पंकज महाले करीत आहेत.