नंदुरबार l प्रतिनिधी
येथील डी.आर.कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे करियर गाईडन्स बाबत मार्गदर्शन करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ नंदनगरी नंदुरबारतर्फे नंदुरबार शहरातील विविध कनिष्ठ महाविद्यालयात करिअर गाईडन्स संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्या अनुषंगानेच नंदुरबार येथील डी.आर.कनिष्ठ महाविद्यालय येथे देखील सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक तथा प्राचार्य पंकज पाठक तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य एम.एल.अहिरराव, रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष फखरूद्दीन जलगुणवाला, सर्विस प्रोजेक्ट चेअरमन इसरार अली सैय्यद, लिटरसी चेअरमन प्रवीण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात कौटील्य फाउंडेशनचे संचालक तथा रोटेरियन प्रवीण पाटील यांनी विद्यार्थ्यांना करियर गायडन्स संदर्भात मार्गदर्शन केले. यात विद्यार्थ्यांना साध्या व सोप्या भाषेत त्यांना करियर संदर्भात भविष्यात येणार्या अडचणींवर कशी मात करावी या संदर्भात माहिती दिली. तसेच पारंपरिक नोकर्यांच्या मागे न धावता त्याच्या पलीकडे देखील अनेक संधी उपलब्ध असतात असे प्रतिपादन प्रवीण पाटील यांनी केले. विद्यार्थ्यांनी देखील काही प्रश्न विचारून त्यांचे निरसन करून घेतले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ.उमेश शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.








